यशवंत जाधव गैरव्यवहार प्रकरणी इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा, मोहित कंबोज यांची मागणी

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. ज्याप्रकारे गैरव्यवहार प्रकरणी यशवंत जाधव यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. त्याप्रकारे एक गोष्ट समोर आली आहे की, इक्बाल सिंग चहल यांनी परदेशात संपत्ती घेतली आहे. येत्या काळात आयकर विभागाला त्याची माहिती देणार आहे, अशी माहिती मोहित कंबोज यांनी सांगितली.

या गैरव्यवहारात मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचा हात आहे का?

मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी यशवंत जाधव गैरव्यवहार प्रकरणी इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा, अशी मागणी केली आहे. तसेच ते म्हणाले की, इक्बाल सिंग चहल यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच इतका मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ब्लॅकलिस्ट कंपन्यांना कोविडचं काम दिलं गेलं. इतका गंभीर भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला. मुंबई महापालिकेमध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार केले जातात. हा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विधानसभेत मांडला होता. तसेच या भ्रष्टाचाराचे आकडे कोटींमध्ये जातायत. त्यामुळे या गैरव्यवहारात मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचा हात आहे का?, असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात निर्माण झालाय, असं कंबोज म्हणाले.

इक्बाल सिंग चहल यांनी परदेशात संपत्ती घेतली ?

ज्याप्रकारे गैरव्यवहार प्रकरणी यशवंत जाधव यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. त्याप्रकारे एक गोष्ट समोर आली आहे की, इक्बाल सिंग चहल यांनी परदेशात संपत्ती घेतली आहे. येत्या काळात आयकर विभागाला त्याची माहिती देणार आहे. पटेलपासून फिल्मस्टारपर्यंतचं वसुलीचं रॅकेट सुरू होतं. त्याची माहिती आम्ही देणार आहोत, असं कंबोज यांनी सांगितलं.

आयकर विभागाकडून फक्त नेत्यांची चौकशी कशासाठी ?

३ तारखेला पहिल्यांदाच असं मुंबई आणि महाराष्ट्रमध्ये घडलंय की, महापालिकेच्या आयुक्तांना आयकर विभागाने नोटीस धाडली. आतापर्यंतच्या इतिहासात आयकर विभागाने स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या गैरव्यवहारप्रकरणी अशा प्रकारची नोटीस आयुक्तांना पाठवलेली मी पाहिलेली नाहीये. परंतु आयकर विभागाकडून फक्त नेत्यांची चौकशी कशासाठी करतायत? ब्यूरो कॅटची चौकशी का होत नाही, असा सवाल मोहित कंबोज यांनी आयकर विभागाला विचारला आहे.

यशवंत जाधव यांनी २२ महिन्यात ३६ मालमत्ता बनवल्या. ३०० ते ३५० कोटींचा गैरव्यवहार करत त्यांनी इतकी मालमत्ता विकत घेतली, असं कंबोज म्हणाले. स्थायी समितीमध्ये एखादे प्रस्ताव गेल्यानंतर त्या प्रस्तावाचा निर्णय महापालिकेचे आयुक्त घेतात. त्यामुळे यशवंत जाधव यांनी केलेल्या गैरव्यवहारानंतर मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांची चौकशी आयकर विभागाने का केली नाही, असा सवाल मोहित कंबोज यांनी आयकर विभागाला विचारला.


हेही वाचा : IPL 2022: आयपीएलमध्ये आजपासून दस का दम, CSK आणि KKR भिडणार आमनेसामने