मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीने एकहाती विजय मिळवला. पण यानंतर आता एक नवा वाद समोर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी ‘गजाभाऊ’ नावाच्या एका अकाऊंटला टॅग करत थेट उचलून आणण्याची भाषा केली. यावरून आता नवा ट्विटरवॉर समोर आला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली. (Mohit Kamboj vs Gajabhau twitter war and Shivsena UBT Sanjay Raut criticized BJP)
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : महायुतीचं सरकार येताच लाडक्या बहिणींना झटका बसणार! लवकरच मोठा निर्णय?
‘धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे!’ असा स्पष्ट इशारा मोहित कंबोज यांनी गजाभाऊ या युजरला दिला. यावर उत्तर देताना गजाभाऊनेही प्रत्युत्तर देत, ‘येताना एकता येऊ नको, बापाला सोबत घेऊन ये मी पण वाट बघतो आहे,” अशा शब्दात आव्हान दिले. त्यानंतरही मोहित कंबोज यांनी, “एक गोष्ट तरी आता स्पष्ट झाली, की तू कोणाचा तरी पाळीव कुत्रा आहे” असा शब्दात पुन्हा डिवचले. त्यावर, ‘कंबोजने काल रात्री सांगितला आहे की जर मी गजाभाऊला 60 दिवसाच्या आत उचलून आणला नाही, तर माझे नाव ‘मोहित गजाभाऊ गायकवाड’. बापाचे नाव “गजाभाऊ गायकवाड” म्हणून लावणार” असा टोला लगावला.
कोण आहे गजाभाऊ?
सोशल मीडियावर गजाभाऊ म्हणून एक ट्विटर हँडल आहे. यावर अनेकदा मराठी भाषा संदर्भात तसेच राजकीय घडामोडींवर भाष्य केले जाते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गजाभाऊ या ट्विटरवरून अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. गजाभाऊ हँडलवरून महायुती, भाजपा, शिवसेनेच्या कामगिरीवर अनेकदा टीका करण्यात आली. यावेळी अनेकदा या हँडलवर धमक्या आलेल्या आहेत. पण मोहित कंबोज यांनी गजाभाऊ या एक्स हँडलला टॅग करत धमकी दिली आहे. शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत याबाबत म्हणाले की, “गजाभाऊ हे मराठी माणसाचे प्रातिनिधिक नेतृत्व करणारे समाजमाध्यमावरील पात्र आहे. ती व्यक्ती कोण आहे? हे कोणालाही माहिती नाही. पण तो महाराष्ट्राचे मराठी माणसाचे प्रश्न समाज माध्यमावर मांडतो. यामुळे जर कोणाच्या पोटात पोटशूळ उठला असेल, तर त्याचा बंदोबस्त हा देवेंद्र फडणवीस यांनीच केला पाहिजे.” असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.