घरमहाराष्ट्रमिरग इलो... मान्सून केरळात, राज्यात झलक !

मिरग इलो… मान्सून केरळात, राज्यात झलक !

Subscribe
आठवड्यात महाराष्ट्रात बरसणार…
चातक पक्षी आणि माणूस ज्याची आतुरतेने वाट पाहतो ते मृग नक्षत्र वेळेवर बरसणार अशी आनंदाची बातमी आली आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती ‘स्कायमेटङ्क या खाजगी हवामान संस्थेने दिली असून, त्याची झलक सोमवारी पहायला मिळाली. तळकोकणात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात मालवणी बोलीत मृग नक्षत्राला ‘मिरगङ्क म्हणतात.
७ जूनला पाऊस पडणार, असा अंदाज करून कोकणातील शेतकरी शेतीच्या आणि बेगमीच्या तयारीला लागतो… दोन पैसे कनवटीला लावण्याची कितीही कामे आणली तरी तो यावेळी नकार देतो आणि म्हणतो, मिरग इलो हा, माका आता येळ नाय… तरवो घालतय!
 दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला धडकतो. मात्र, यंदा दोन ते तीन दिवस आधीच केरळात दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासात त्याची वाटचाल दक्षिण-अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या खाडीचा परिसरात अशी होते.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण पुढच्या सात दिवसांत तो महाराष्ट्रात धडकतो. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही त्याचे वेळेत आगमन होईल, असा अंदाज आहे.
लातूरला थैमान, एकाचा मृत्यू
मोसमी पावसाने लातूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसात वीज कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील नणंद गावात घडली. दुपारपासूनच लातूर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उकाडा वाढला होता. लातूर शहर आणि परिसर, ग्रामीण भाग यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र निलंगा तालुक्यातील अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. यात नणंद या गावाच्या शिवारातील शेतकरी नारायण लादे यांच्यावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.
कोकणातही पावसाची हजेरी
कोकणातही पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह पाऊस झाला. सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे जोरदार पाऊस झाला. तर जिल्ह्यातील अन्य भागांत ढगाळ वातावरण आहे.
उकाड्यापासून दिलासा
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातून सध्या उष्णतेच्या लाटेने काही प्रमाणात माघार घेतल्याची माहितीही स्कायमेटने दिली. विदर्भातील ठराविक भागात अजूनही उष्णतेचा तडाखा कायम आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -