घरमहाराष्ट्रआनंदसरी...यंदा वेळेत मान्सूनचे आगमन

आनंदसरी…यंदा वेळेत मान्सूनचे आगमन

Subscribe

१ जून रोजी केरळ, तर १० जूनला तळकोकणात येणार

कोरोनाची लाट, ऑक्सिजनचा तुटवडा, औषधांचा काळाबाजार, महागाईचा फटका आणि कडक उन्हाचा तडाखा… अशा एकामागोमाग एक संकटातून जाणार्‍या लोकांसाठी एक आनंदाची बातमी असून यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होणार आहे. मान्सूनच्या या आनंदसरीत न्हाऊन जाऊन काहीकाळ का होईना मन हलके चिंब होऊन जाईल, अशी आशा घेऊन हा आनंद वर्षाव होणार आहे. मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होणार असून १५ ते २० जून दरम्यान तो उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या मते, यंदा मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असून यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल. जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून हजेरी लावणार असल्यामुळे त्याचा पुढचा प्रवास नियमित राहणार आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ मे पासून अधून मधून वळीवाचा पाऊस पडू शकतो. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सूनला विलंब झाला होता. मात्र, यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला, तर महाराष्ट्रातही मान्सूनचा प्रवेश वेळेवर होईल.

- Advertisement -

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी मान्सून संदर्भातील ट्वीट करून ही माहिती दिली आहे. यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असून उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यताही स्कायमेटने वर्तविली आहे. देशात नैऋत्य मोसमी वार्‍यांमुळे मान्सूनचा प्रवेश होतो. केरळमध्ये सर्वप्रथम मान्सूनचं आगमन होते. केरळमध्ये दरवर्षी १२० दिवसांच्या पावसाळ्यामध्ये सरासरी २०४.९ सेंटिमीटर मान्सूनची नोंद व्हायची. पण गेल्या वर्षी केरळमध्ये सरासरीच्या तब्बल ९ सेंटिमीटर अधिक म्हणजेच २२२.७९ सेंटिमीटर इतका पाऊस पडला होता.

पावसाचे प्रमाण ठरवण्याचे मापदंड
केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाचं प्रमाण सामान्य आहे, कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्याचे काही मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण कमी मानले जाते. सरासरीच्या ९० ते ९६ टक्क्यांच्या मध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्यपेक्षा कमी ठरते. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्य म्हणजे समाधानकारक मानले जाते. हेच प्रमाण १०४ ते ११० टक्क्यांच्या मध्ये असल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक तर ११० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्यास अतिवृष्टी मानली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -