Monsoon Update : अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती

मागील काही दिवसांपासून मान्सून केरळासह (Monsoon In Kerala) राज्यात कधी दाखल होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. मान्सून काही काळ श्रीलंकेच्या (Srilanka) वेशीवर अडकला होता. मात्र, अखेर आज मान्सून केरळात दाखल झाला आहे. आज सकाळच्या दरम्यान केरळ राज्यांतील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात ढगाळ वातावरण असल्याची माहिती हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. यंदा पाऊस चांगला होईल असंही हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी अंदाज वर्तवला होता. मान्सून वेळेआधी दाखल झाल्याने शेतकरीही सुखावला आहे.

मान्सून केरळात दाखल झाल्यामुळे राज्यात पाऊस १ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, २९ मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी देखील केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली आहे. मान्सून केरळमधील कन्नूर, पल्लकड आणि मदूराईमध्ये दाखल झाल्याचं म्हटलं आहे. त्या ठिकाणी पाऊस सुरु आहे.

दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयातील प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.


हेही वाचा : संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची उडी फसली, संजय राऊतांचा भाजपला टोला