घरदेश-विदेशमान्सूनची केरळसह महाराष्ट्राला हुलकावणी, 'या' दिवशी पाऊस पडण्याची शक्यता

मान्सूनची केरळसह महाराष्ट्राला हुलकावणी, ‘या’ दिवशी पाऊस पडण्याची शक्यता

Subscribe

मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही याचा परिणाम होऊन महाराष्ट्रात 15 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळेच नागरिकांकडून एखाद्या चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहण्यात येत आहे. साधारणतः रविवारी (ता. 04 जून) मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. कारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होत असतो. पण रविवारी मान्सूनने केरळला मोठी हुलकावणी दिल्याने आता महाराष्ट्रातही मान्सून उशीराच दाखल होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही याचा परिणाम होऊन महाराष्ट्रात 15 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा – Weather Breaking : अरबी समुद्रात नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता; हवामान विभागाचं लक्ष 

- Advertisement -

केरळसह महाराष्ट्रात उशीरा मान्सून दाखल होणार असला तरी, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. त्यामुळे नागरिकांची थोड्याफार प्रमाणात का असेना पण गरमीपासून सुटका झाली आहे. पण मुंबईकर मात्र या उष्णतेमुळे हैराण झालेले पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक भागात दुपारच्यावेळी शुकशुकाट पाहायला मिळतो.

महत्त्वाची बाब म्हणजे, मान्सून जरी लांबणीवर गेला असला तरी खरीप पेरणीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. परंतु, आता केरळमध्ये या आठवड्यात मान्सून येण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून उशीरा म्हणजेच 15 जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागांत मान्सूनपूर्व पाऊस येऊ शकतो, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

राज्यातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, आदी भागांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या विविध भागात शनिवारी (ता. 03 जून) रात्री आणि रविवारी (ता. 04 जून) दुपारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अंगावर झाड, दगड कोसळून ४ तर वीज पडून ७ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये नंदुरबार, बीड, जळगाव, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील घटनांचा समावेश आहे. वृक्ष आणि विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला असून पिकांचे नुकसान व पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

तसेच, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसासह जोरदार वादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगणा येथे हवामान कोरडे राहू शकते. तसेच, स्कायमेटने सांगितल्या प्रमाणे पुढील 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि केरळ, तामिळनाडू, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, ओडिशाचा दक्षिण किनारा आणि किनारपट्टीवर एक किंवा दोन जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -