घरताज्या घडामोडीकृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे ते शेतकरी पाकिस्तानातून आले आहेत का? - भुजबळांचा...

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे ते शेतकरी पाकिस्तानातून आले आहेत का? – भुजबळांचा मोदींना सवाल

Subscribe

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या अधिवेशनात कृषी कायद्याविरोधात मोदी सरकारवर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मोदींना असा सवाल केला की, ‘दोन-चार दिवसांचं आंदोलन किती त्रासदायक असतं? आणि हे आंदोलन तब्बल आठ महिने सुरू आहे. ते दिल्लीत जायला लागले, तर त्यांच्यावर काय-काय केसेस टाकल्या. अरे ते दुश्मन आहेत का? की ते पाकिस्तानातून आलेत?’

नक्की छगन भुजबळ काय म्हणाले?

कृषी कायद्याविषयी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ‘दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील २०० हून जास्त लोकं कोरोना आणि इतर आजारामुळे दगावले आहेत. कोणी एकाने आत्महत्या केली तर आपण किती संवेदना प्रकट करतो, ताबडतोब चौकशी करतो आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्याच्यावर आपण कारवाई करण्याचे आदेश देतो आणि कारवाई करतो. आज २०० हून जास्त जणांचा बळी गेलाय, कदाचित यापेक्षा जास्त. दुर्दैव असं की, मंत्री याचे चर्चा करायचे. हा जो खेळ आहे तो जगाने, देशाने आणि महाराष्ट्राने पाहिला आहे. शेतकऱ्यांनी भेटायला जायचं बोललं तर शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये खिळे पसरले. लोकशाहीला काळीमा लावणार हा प्रकार होता. अख्ख्या जगाने त्याची नोंद घेतली. टिका व्हायला लागल्यानंतर खिळे बाहेर काढले.’

- Advertisement -

पुढे भुजबळ म्हणाले की, ‘या देशात खायला अन्न नव्हते हे मी पाहिलं आहे. १९७२ सालचा दुष्काळ मी पाहिला आहे. त्यावेळेस अमेरिकेतून येणारा लाल गहू आम्ही पाहिला आणि खाल्ला आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंत राव नाईक यांनी सांगितलं, ही परिस्थिती बदलून टाकली नाहीतर मला चव्हाट्यावर फाशी द्या. त्यांनी केलेली कृषी क्रांती सुरू राहिली. युपी सरकारचे पंतप्रधान मनमोहन सिंग, कृषीमंत्री शरद पवार यांच्या काळात शेतकऱ्यांना मदत करून हमी भाव दुप्पट, तिप्पट, चौप्पट वाढवून दिला. सव्वा कोटींची भूक भागवून परदेशातील २५ देशांना अन्नाची गरज या देशाने पूर्ण केली. या कोरोनाच्या काळात प्रत्येक जण सॅनिटायझर लावून काम करत होता. पण शेतकरी त्यांच्या कुटुंबांसह हिवाळा, पावसाळा, उन्हाळा आणि कोरोनाला न बघता राबत होता. त्याने अन्नधान्य पिकवलं. आपण इतरांना कोरोना योद्धा म्हणतो, पण शेतकरीही कोरोना योद्धाच आहे.’

‘दोन-चार दिवसांचं आंदोलन किती त्रासदायक असतं? आणि हे आंदोलन तब्बल आठ महिने सुरू आहे. ते दिल्लीत जायला लागले, तर त्यांच्यावर काय-काय केसेस टाकल्या. अरे ते दुश्मन आहेत का? की ते पाकिस्तानातून आलेत? ते आपलेत आहेत ना. त्यांच्या मतावर संसद तयार झाली, विधानसभा तयार झाल्या. त्यांच म्हणं ऐकायला नको. कायदे करत असताना विरोध होतो, त्यावेळेस लोकांना काय हवंय हे लक्षात घेतो. पण इथे बोलायलं गेले तर शेतमाल विका, हे विका, ते विका, काय करायचं? कशाचीही चर्चा नाही,’ असे भुजबळ म्हणाले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -