आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; शिंदे सरकार विरुद्ध शिवसेना रंगणार सामना

Maharashtra Assembly session cm eknath shinde govt floor test shiv sena mlas speaker polls rahul narvekar rajan salvi devendra fadnavis bjp uddhav thackeray

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. जवळपास दीड महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला विरोधकांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागणार आहे. विशेषत:, शिवसेनेतील ठाकरे गट जास्त आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईमध्ये 25 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्षात सहा दिवसच चालणार आहे. 19 ऑगस्टला गोपाळकाला असल्याने दोन्ही सभागृहांना सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, शनिवार आणि रविवारीही सुट्टी असल्याने कामकाज होणार नाही. शिवाय, 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित सहा दिवस राज्यातील पूरस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अन्य प्रश्नांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर येताच आधीच्या ठाकरे सरकारच्या काळातील अनेक निर्णयांना स्थगिती दिली तर, काही निर्णय फिरवले आहेत. त्यात बहुतांश निर्णय हे शिवसेनेशी निगडीत असल्याने शिवसेना जास्त आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेता शिवसेनेचा असल्याने तिथे सत्ताधारी शिवसेना विरुद्ध विरोधक शिवसेना असे चित्र पाहायला मिळेल.

शिवसेनेच्या निशाण्यावर शिंदे गट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. याच बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे शिवसेनेच्या निशाण्यावर शिंदे गट राहील, अशी शक्यता आहे. एकूणच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मधील अग्रलेखातही प्रामुख्याने शिंदे गटालाच लक्ष्य करण्यात येत आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका मवाळ आहे. या दोन पक्षांच्या निशाण्यावर प्रामुख्याने भाजपाच असेल, असे जाणाकारांचे मत आहे.

चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता
प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचे आयोजन केले जाते. त्यानुसार सायंकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावर विरोधक बहिष्कार टाकला आहे. विरोधकांच्या बहिष्कारामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, ही खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली.