पावसाचे धुमशान : मुंबई, ठाण्याला ऑरेंज, तर कोकणाला रेड अलर्ट

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह कोकणात मुसळधार,हवामान खात्याचा राज्यात ७-८ जुलैला अतिवृष्टीचा इशारा,पुढील ५ दिवस मुसळधार

सलग दुसर्‍या दिवशी मुंबई आणि उपनगरांत कोसळणार्‍या मुसळधार पावसाचा कहर सुरूच होता. सतत कोसळणार्‍या पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागात पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल झाले. घरात पाणी घुसल्याने रहिवाशांची एकच धावपळ उडाली, तर रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे कोलमडली, पाण्याखाली रेल्वे रूळ लुप्त झाल्याने लोकलचा वेग मंदावला. मुंबईसह कोकणातही गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. राजापूर, खेड, चिपळूण या भागांतही जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील ५ दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याने प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

मुंबईत पुढील ५ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ आणि ८जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे, तर रत्नागिरी आणि रायगड या २ जिल्ह्यामध्येही पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील ४ दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील कंट्रोल रुमचा आढावा घेत प्रशासनाला उपाययोजनांच्या सूचना दिल्या.

मुंबईत धुवाँधार पावसामुळे विक्रोळी, वांद्रे, दादर, हिंदमाता, सायन, भायखळा, परळ, बोरिवली, कांदिवली, अंधेरी भुयारी मार्ग, टिळक नगर टर्मिनस, टेम्बी पूल परिसर, कुर्ला येथील शेख मेस्त्री दर्गा, नेहरूनगर या भागात पाणी साचले. परिणामी, या भागांतील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आणि वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. परिणामी, वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालकांना सोसावा लागला. कुर्ला, चेंबूर, सायन, किंग्ज सर्कल, वडाळा या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

कुर्ला येथून चेंबूरच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. सायन येथील गुरुकृपा हॉटेलसमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते, तर किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केटमध्येही पाणी साचले होते. वांद्रे टी जंक्शनवर पाणी भरले, तर घाटकोपर लिंक रोडही पाण्यात गेले. बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर तळे साचले होते. वसई, विरार, नालासोपर्‍यात जोरदार पाऊस झाला.

रत्नागिरी आणि कोल्हापूरला पावसाचा तडाखा बसला आहे. कोकणात मुसळधार पाऊस असल्याने रत्नागिरीत, महाडमध्ये पूरस्थिती असून, कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग आठ दिवस बंद राहणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने महाडसह परिसराला पुराचा धोका निर्माण झाला आहे.

मागील २४ तासांत पडलेला पाउस
सांताक्रूझमध्ये १२४.२ मिमी, कुलाब्यामध्ये ११७.४ मिमी, सीएसएमटी ९५ मिमी, भायखळा ९२.५ मिमी, चेंबूर ९९.५ मिमी, माटुंगा ०.५ मिमी, शीव ६६ मिमी, विद्याविहार ९९ मिमी, जुहू विमानतळ १०१.५ मिमी, मुंबई विमानतळ ९४ मिमी पावसाची नोंद झाली.