मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय दररोज मासे खायची, त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. तुम्ही सुद्धा मासे खा म्हणजे तुमचेही डोळे सुंदर होतील, असा सल्ला राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी दिला आहे. त्यावरून वादंग निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विटरवरून डॉ. गावित यांच्यावर टीका केली आहे.
मा. गावित साहेब… प्रेमात पडणं ही नाही तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय ही आजच्या युवा वर्गाची प्राथमिकता आहे. त्यामुळे सल्ले द्यायचे असतील तर शिक्षण, नोकरी संदर्भात द्या…
आणि हो…
डोळे कसे दिसतात यापेक्षा त्या डोळ्यातलं पाणी बघणं, चिकण्या स्कीनऐवजी नोकरी मिळत नसल्याने टेन्शनमुळं…— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 22, 2023
नंदुरबारमधील भाजपा आमदार विजयकुमार गावित हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. मासेमारी करणाऱ्यांना साधनसामुग्रीचे वाटप करण्यासाठी धुळ्यामध्ये आयोजित कार्यक्रमात विजयकुमार गावित प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपस्थितांना मासे खाण्याचे फायदे सांगताना त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. विजयकुमार गावित म्हणाले की, मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर माणूस म्हणजे बाईमाणूस चिकने दिसायला लागतात आणि डोळे तरतरीत दिसतात. कुणीही बघितली तरी पटवूनच घेणार. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना, ती बंगळुरूला समुद्रकिनारी राहायची. त्यामुळे ती दररोज मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत. माशांमध्ये तेल असते. माशांच्या तेलामुळे डोळ्यांना आणि त्वचेला चांगला फायदा होतो, असे त्यांनी सांगितले. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – “दीडशहाणे मंत्री कालपर्यंत…” कांद्याच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी दादा भुसेंना केले लक्ष
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत, गावित साहेब… प्रेमात पडणे ही नव्हे तर, शिक्षण, नोकरी, व्यवसाय ही आजच्या युवा वर्गाची प्राथमिकता आहे. त्यामुळे सल्ले द्यायचे असतील तर शिक्षण, नोकरी संदर्भात द्या, असे सुनावले आहे.
डोळे कसे दिसतात यापेक्षा त्या डोळ्यातले पाणी बघणे, चिकन्या स्किनऐवजी नोकरी मिळत नसल्याने टेन्शनमुळे तारुण्यातच युवांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बघणे आणि काबाडकष्ट करणाऱ्या त्यांच्या आईवडिलांच्या हातावरच्या भेगा पाहणे, हे तुमचं काम आहे. कारण तुम्ही मंत्री आहात, याची सुद्धा त्यांनी आठवण करून दिली आहे.