चिमुकलीचा गळा घोटून आईने केली आत्महत्या

नाशिक : वैवाहिक जीवनात सौख्य लाभत नसल्याच्या भावनेतून नैराश्यापोटी स्वतःच्या दीड वर्षांच्या मुलीचा खून आईने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१४) सकाळी ७ वाजेदरम्यान वणीतील मोठा कोळीवाडा येथे घडली. याप्रकरणी मृत महिलेविरोधात वणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविता विकास कराटे (वय 33, रा. कृष्णगाव) व तनुजा विकास कराटे असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता विकास कराटे हिचे माहेर वणी येथील वणी पिंपळगाव रस्त्यावरील महादेवनगर येथे आहे. मंगळवारी (दि.14) सकाळी सात वाजेच्या सुमारास सविता हिने दीड वर्षांची मुलगी तनुजा हिस माहेरच्या घरात गळफास देवून तिचा खून केला. त्यानंतर तिने साडीने गळफास घेत आत्महत्या केली. सविता हिचे तीन विवाह झाले आहेत. मात्र, विवाहसौख्य लाभले नाही ही भावना तिच्या मनात घर करुन राहिली होती. त्यामुळे तिने पोटच्या मुलीचा खून करुन स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी सविता कराटे हिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे करत आहेत.