हातात स्टम्प, बॅट घेत मनसैनिकांचे आंदोलन; संदिप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

नाशिक : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. नाशिकमध्ये मनसैनिकांनी एकत्र येत आंदोलन केले आहे. हल्ले करणार्‍यांना जशास तसे उत्तर देणार असा इशारा आंदोलक मनसैनिकांनी दिला आहे. नाशिक शहरातील मनसेच्या राजगड कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी हातात स्टम्प, बॅट घेउन आंदोलन करण्यात आले.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी सात वाजेच्या सुमारास मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात प्राणघातक हल्ला झाला. देशपांडे हे मॉर्निंग वॉकला गेले असताना अज्ञात संशयितांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रभर खळबळ माजली आहे. देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. आता नाशिक शहरात देखील मनसे कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील मनसेच्या राजगड कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन केले आहे. यावेळी हातात बॅट, लाकडी दांडे आणि स्टंप घेत मनसैनिकांनी आंदोलन केले. त्याचबरोबर देशपांडे यांच्यावर हल्ले करणार्‍यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा मनसैनिकांकडून देण्यात आला आहे. यावेळी आंदोलन दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राजकीय, सामाजिक क्षेत्रांत मतभिन्नता असू शकते, क्वचितवेळी मनभिन्नताही असू शकते, पण त्यासाठी एकट्या-दुकट्या राजकीय नेत्यावर लपून-छपून, टोळीने येऊन भ्याड हल्ला करण्याची पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नसून ही असंस्कृतपणाची कीड महाराष्ट्राच्या राजकारणाला लागू नये असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या हल्ल्याचा अत्यंत तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी ‘इंट का जवाब..पत्थर से देंगे..करारा जवाब मिलेंगा’ आदि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, महिला सेना उपाध्यक्षा सुजाताताई डेरे, मनोज घोडके,सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, योगेश लभडे, नितीन माळी, साहेबराव खर्जुल व धिरज भोसले, राकेश परदेशी, अतुल पाटील, संतोष कोरडे, अमित गांगुर्डे, विजय आहिरे, प्रकाश कोरडे, भाऊसाहेब ठाकरे, मिलिंद कांबळे, ज्ञानेश्वर बगडे, किरण क्षिरसागर, किशोर वडजे आदींसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.