घरमहाराष्ट्रसंपूर्ण लॉकडाऊनकडे वाटचाल!

संपूर्ण लॉकडाऊनकडे वाटचाल!

Subscribe

आज मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठक

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून कडक निर्बंध जारी करूनही परिस्थितीत फारसा फरक पडताना दिसत नाही. हे लक्षात घेऊन राज्य सरकार पुढील आठवड्यापासून कडक लॉकडाऊनचा विचार करत आहे. यासाठी शनिवार १० एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. राज्यात ३० एप्रिलपर्यंत कोरोनाची मोठी लाट पसरणार असल्याचा अंदाज असल्याने तीन आठवड्याच्या लॉकडाऊनविषयी सरकार निर्णय घेण्याची दाट शक्यता असून तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असून या बैठकीला विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश असेल. राज्यात कोरोना लस तुटवड्याचे आव्हान असून ऑक्सिजन पुरवठ्याला मर्यादा तसेच रक्ताच्या टंचाईचे संकट उभे असल्याने राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या वाढत असून मृत्यूची संख्या सुद्धा पुढे जात आहे. याला लगाम घालायचा असेल तर काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा असण्याबाबत एकमत होत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांमधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील उपस्थित असणार आहेत.त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियंत्रणाच्या निर्णयासाठी या विरोधी पक्षांकडून नेमकी काय भूमिका घेण्यात येते हे महत्वाचे आहे.

राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे केंद्र विरूद्ध असे राजकारण पेटले आहे. महाराष्ट्रात लसीच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रे बंद झाली आहेत. अशावेळीच लसीचा ४० लाख डोस इतका पुरवठा द्या, अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात येत आहे; पण तुलनेत महाराष्ट्राला लसीचे डोस कमी प्रमाणात येत असल्यानेच महाराष्ट्रातून आणखी लसीच्या डोसची मागणी करण्यात येत आहे. एका आठवड्याच्या कालावधीत रूग्णसंख्येत कोणतीही घट न झाल्यानेच मुख्यमंत्र्यांनी आता विकेंड लॉकडाऊन ऐवजी संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय चाचपण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, त्या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत.

- Advertisement -

परिस्थिती हाताबाहेर-वडेट्टीवार
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचे मत घेतले जाईल, याकडे विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले आहे. राज्यात ३ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन घोषित करावा ही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली असून नागरिकांचा जीव अमूल्य आहे, ते वाचविण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागेल’, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक शहरात दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. मृत्यूदरहीत वाढत असल्याने स्मशानभूमी फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे कधी एकाच सरणावर ८ मृतदेह तर कधी एकावेळी २२ मृतदेहांना अग्नी द्यावा लागतो. त्यामुळेच कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -