लोकांनी इतके रंग बदलल्याचे पाहून सरड्यालाही लाज वाटेल, अरविंद सावंतांची राज ठाकरेंवर टीका

Mp Arvind Sawant criticizes Raj Thackeray change colour like lizard
लोकांनी इतके रंग बदलल्याचे पाहून सरड्यालाही लाज वाटेल, अरविंद सावंतांची राज ठाकरेंवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास धरत महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेवरसुद्धा टीकास्त्र डागलं आहे. राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांवरुन शिवसेने खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केलं आहे. लोकांनी इतके रंग बदललेत ते पाहून सरडासुद्धा लाजेल अशी टीका अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंवर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. अरविंद सावंत म्हणाले की, हिंदुत्वाची रस्सीखेच कसली? ज्यांच्याकडे रस्सी नाही त्यांनी काय खेचायचं? रस्सी विचारांची असली पाहिजे. सरडा रंग बदलतो कदाचित त्यांनासुद्धा लाज वाटेल. इतके रंग ते बदलत आहेत. सरडा म्हणेल मी बरा होतो तुम्ही तर त्यापेक्षा खराब आहात. लोकांनासुद्धा असली आणि नकली कळतं असे अरविंद सावंत म्हणाले असून राज ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांनी तमाशा पाहून घेतलाय

हिंदुत्ववादावर अरविंद सावंत म्हणाले की, देशाला हिंदुत्वाचा विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. मागील ३ वर्षांपासून तुणतुण वाजवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमी आहेत. त्यांनी तमाशा पाहून घेतला आहे. १४ मेला या. त्या तुणतुण्याची तार कशी तुटते, ती बघा असा खोचक टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

ब्रृजभूषण सिंह यांनी असली कोण नकली कोण ओळखलंय

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला यूपीचे भाजप खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. परंतु पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे स्वागत करु असे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे असली कोण आणि नकली कोण त्यांना कळलं असल्याचे अरविंद सावंत म्हणाले आहेत.


हेही वाचा : अयोध्येच्या वादात महाराणा प्रताप सेनेची उडी, राजनंतर आदित्य ठाकरेंना नो एन्ट्री