घरमहाराष्ट्रठाकरेंचे खासदार बंडू जाधव यांचा पक्षाला घरचा आहेर; म्हणाले '...यामुळे शिंदेची बंडखोरी'

ठाकरेंचे खासदार बंडू जाधव यांचा पक्षाला घरचा आहेर; म्हणाले ‘…यामुळे शिंदेची बंडखोरी’

Subscribe

खासदार बंडू जाधव यांनी शिवसेनेतील बंडखोरीला उद्धव ठाकरे आणि आदित्यही जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ठाकरे कुटुंबातच दोन मंत्रिपदे अडकल्याने पुढे आदित्य आपल्याला डोईजड होणार या भीतीने शिंदेंनी बंडखोरी केली.

हिंगोली – जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आणि एकनाथ शिंदेंनी वेगळी चुल मांडली. ते एकटेच शिवसेनेतून बाहेर पडले नाही तर त्यांनी पक्षाचे ४० आमदारही सोबत नेले आणि खासदारांनाही गळाला लावलं. शिंदेंनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिंदे-फडणवीस सरकारला आता महाराष्ट्रात आठ महिने होत आले आहेत. दरम्यानच्या काळात शिवसेना हे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्याला उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यासोबतच रस्त्यावरही शिवसेना आता उतरली आहे. शिवगर्जना मेळावे जिल्ह्याजिल्ह्यात सुरु आहेत. याच मेळाव्यात परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घरचा आहेर दिला आहे. (MP Bandu Jadhav has said that Uddhav Thackeray and Aditya are also responsible for the rebellion in Shiv Sena)

हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात खासदार जाधव यांनी शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य यांना मंत्री करायला नको होते. आदित्य यांना मंत्री करायचे होते तर स्वतः मुख्यमंत्री पद घ्यायला नको होते. मात्र बाप आणि मुलगा दोघेही मुख्यमंत्री आणि मंत्री झाले. दोन खुर्च्या दोघांनी अटवल्या. यामुळे पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ उरला नाही. ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला पाहिजे होते. किंवा कोणाला तरी पक्षाचे अधिकार द्याययला हवे होते. ते झाले नाही म्हणून चोरांना संधी मिळाली. आणि हा प्रसंग ओढावला, हे सत्य आहे.’

- Advertisement -

खासदार जाधव म्हणाले, ‘ठाकरे कुटुंबातच दोन मंत्री झाल्यामुळे बापानंतर पोरगा आमच्या बोकांडी बसतो की काय? यापेक्षा आपणच वेगळी चुल मांडलेली बरी, या भूमिकेतून ही बंडखोरी झाली आहे.’
खासदार बंडू जाधव यांच्या या विधानाने त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडोखोरीचे कारण सांगितले असले तरी, त्यांचाही मोर्चा आता शिंदे गटाकडे वळतो की काय, अशी शंका शिवसैनिकांमध्ये उपस्थित होत आहे.

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला गेल्यानंतर ठाकरे गटाने शिवगर्जना अभियान सुरु केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात संजय राऊत या अभियानाचे नेतृत्व करत आहेत. तर दुसरीकडे उपनेत्या सुषमा अंधारे या मोर्चा सांभाळत आहेत.
खासदार बंडू जाधव यांनी बंडखोरीचे कारण शिवसेनेच्याच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मंचावरुन सांगून पक्षाला सावध केले आहे की, आपला मार्ग जाहीर केला याचीही चर्चा होत आहे.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -