विनायक राऊत, नितीन देशमुखांवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ प्रकरणी भावना गवळी आक्रमक

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी नितीन देशमुख आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी माझ्या अंगावर आले. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांनी चिथवले, असा आरोप भावना गवळी यांनी केला.

bhavna gawali

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी नितीन देशमुख आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी माझ्या अंगावर आले. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांनी चिथवले, असा आरोप भावना गवळी यांनी केला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही भावना गवळी यांनी म्हटले. (MP Bhavana Gawli File a case against Vinayak Raut Nitin Deshmukh)

नेमके प्रकरण काय?

बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आज आमने-सामने आले. विदर्भ एक्सप्रेसने आज अकोला रेल्वे स्थानकावरून दोन्ही खासदार मुंबईकडे जात असताना समोरासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी झाली. यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख हे उपस्थित होते.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजीनंतर भावना गवळी संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यावेळी त्यांनी म्हटले की, अकोला रेल्वे स्थानकावर अत्यंत घाणेरडे वृत्तीने तिथे माझ्यासोबत वर्तन घडले. त्या लोकांच्या जमावात माझा जीवही गेला असता. त्यामुळे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख या दोघांवर गुन्हे दाखल होऊन अटक झाली पाहिजे. माझी तक्रार मी राज्य महिला आयोग, लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करणार आहे.

“दरवेळीप्रमाणे अकोल्याहून मी मुंबईला येताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख जवळपास ५०-१०० जणांसह तिथे होते. मी रेल्वेत बसत असताना त्यांनी लोकांना चिथवण्याचे काम केले. त्यांना माझ्या अंगावर पाठवले. अक्षरश: ते माझ्या अंगावर आले. माझा जीव जाईल असं त्यांचे कृत्य होते. नीच वागणूक तिथे झाली. हे सगळं काम विनायक राऊत, नितीन देशमुख यांनी केलेय. त्यामुळे अकोला एसपींकडे मी माझी तक्रार दिली आहे. विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्याही घरी मायबहिणी आहेत. त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल अशी हीन दर्जाची वागणूक दिली असती तर ते तसेच पाहत उभे राहिले असते का?. यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे. हे राज्य छत्रपतींचे आहे. मी असं राजकारण करू शकत नाही. माझं राजकारण विकासाचं आहे. लोकांना समाधानी आणि योजना लोकांपर्यंत कशा पोहचल्या पाहिजे यासाठी राजकारण आहे”, असेही भावना गवळी यांनी म्हटले.

याशिवाय “आम्ही बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आलो. आज त्यांच्यासोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडून ज्यांनी विरोधकांशी युती केली ते खरे गद्दार आहे. तुम्ही चांगले वागले नाहीत म्हणून आम्ही गेलो नाही. काल जी कृती केली ती बोलण्यापलीकडची होती. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आले नाही ते बिहारला गेले. तुम्ही गद्दार आहात. आधी घर सांभाळा” अशा शब्दात भावना गवळींनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.


हेही वाचा – BMC Election 2023 : आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरुया; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन