घरमहाराष्ट्र'राज'दरबारी महायुतीची खलबतं? खासदार शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

‘राज’दरबारी महायुतीची खलबतं? खासदार शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

Subscribe

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात आघाडी आणि युतीची नवी समिकरणे पाहायला मिळत आहेत. कधीकाळी कट्टर प्रतिस्पर्धी असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आली आहेत. तर, सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विरोधातील पक्षांनी युती केल्याचीही उदाहरणे पाहिली आहेत. आता, अशाच नव्या महायुतीची चर्चा संबंध महाराष्ट्रभर होत आहे. मनसे, भाजपा आणि शिंदे गटातील जवळीक पाहता हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन युती स्थापन करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येतेय. असं असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर (Shivtirtha) जाऊन भेट घेतली. त्यामुळे महायुतीच्या (Mahayuti) चर्चांना आणखी उधाण आले आहे.

येत्या काळात मनसे, भाजपा आणि शिंदे गटात महायुती होऊ शकते, असं मोठं विधान कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी केलं होतं. तर, महायुतीची शक्यता ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही वर्तवली आहे. यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे जाऊन भेट घेतली. दिवाळीनिमित्त ही सदिच्छा भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. मात्र, राज दरबारी गेलेले मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र नेमक्या कोणत्या कारणासाठी गेले होते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

श्रीकांत शिंदे आज सपत्नीक शिवतीर्थावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केसुद्धा होते. भेट झाल्यानंतर, श्रीकांत शिंदे यांना निरोप देण्याकरता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे शिवतीर्थच्या दारापर्यंत आल्या होत्या. यावेळी श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी शर्मिला ठाकरे यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले. त्यानंतर, राज ठाकरे यांनी त्यांना हात हलवून निरोप दिला.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकमेव आमदार आहे. त्याच, लोकसभा मतदारसंघात डॉ.श्रीकांत शिंदे खासदार आहेत. आमदार राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. असं असतानाही श्रीकांत शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेणं म्हणजे महायुतीचे पडघम असल्याचं बोललं जात आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -