घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखा. गोडसेंना गावांमधून फिरू देणार नाही; जिल्हाप्रमुख करंजकरांचा गर्भित इशारा

खा. गोडसेंना गावांमधून फिरू देणार नाही; जिल्हाप्रमुख करंजकरांचा गर्भित इशारा

Subscribe

नाशिक : हिम्मत असेल माझ्यासमोर निवडणूक लढवावी, अशा शब्दांत खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले होते. त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर पलटवार केला. राऊत तर फारच लांब गोडसेंनी फक्त माझ्यासमोर उभे राहावे, नाही डिपॉझिट जप्त झाले तर नावाचा शिवसैनिक सांगणार नाही, असे खुले आव्हान तसेच जर ते अधिक काही बोलले तर जिल्ह्यातील कुठल्याही गावातून फिरू देणार नाही असा गर्भित इशारा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दिला आहे.

ज्या खासदार संजय राऊत यांच्यामुळे गोडसेंना १० वर्षे खासदारकी मिळाली अशा ‘वाग्यां’ने ‘सूर्यावर थुंकण्याचा’ केविलवाना प्रयत्न करू नये. अन्यथा, अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला. शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सध्या कलगीतुरा रंगलेला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी हेमंत गोडसे हा काय राजकीय चेहरा होता का, असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर शनिवारी (दि.3) खासदार गोडसेंनी या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याने नाशिकचे पदाधिकारी अधिक खवळले आहेत. त्यांनी रविवारी (दि.4) शिवसेनेच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

- Advertisement -

यावेळी माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, महापालिकेचे माजी गटनेते विलास शिंदे, योगेश बेलदार उपस्थित होते. जिल्हाप्रमुख करंजकर म्हणाले की, गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात गोडसेंनी एकही लोकाभिमुख काम केलेले नाही. हेमाडपंथी मंदिराचे भूमिपूजन व महिला वसतिगृहाचे भूमिपूजन माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले. या कामांसाठी कुदळ मारुन तीन वर्षे उलटूनही कामाचा पत्ता नाही. नाशिकरोडला रेल्वेचे व्हिल्स बनवण्याचा कारखाना उभारणार म्हणून रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन केले, अजून या ठिकाणी कशाचाही पत्ता नाही. केवळ दिल्लीतील मंत्र्यांना निवेदन देण्यातच त्यांची आठ वर्षे गेली.

शिवसेनेत येण्यासाठी त्यांनी खासदार संजय राऊत यांचे दिल्लीत पाय धरले होते. आता दोन वेळा खासदार केल्यानंतर त्यांच्यावर आरोप करुन स्वत:ची अवहेलना खासदार गोडसे करत असल्याचा आरोप करंजकर यांनी केला. गोडसेंनी आरोप थांबवले नाही तर अंगावर आलेल्यांना शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराच महानगरप्रमुख बडगुजर यांनी दिला.

- Advertisement -
कपडे घालायलाच मी शिकवले : गिते

खासदार गोडसे यांचा राजकीय जन्मच माझ्यामुळे झाला. मनसेत असताना माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचा वारसदार म्हणून हेमंत गोडसे यांना शिवसेनेत घेतले. त्यांची ओळख निर्माण करुन दिली. कपडे कसे घालावेत याविषयी सांगितले, राजकीय व्यक्तीने कसे बोलले पाहिजे, याविषयी शिकवले. त्यामुळे त्यांना माझ्यावर टीका करण्याची लायकी नसल्याचे माजी आमदार वसंत गिते यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -