लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत; फडणवीसांनी केलं स्पष्ट

devendra fadnavis
संग्रहित छायाचित्र

 

पुणेः लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार नाहीत. आधी लोकसभा निवडणुका होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात त्या निवडणुका होतील. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. अधिक मेहनत करुन आम्ही विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वर्तवली आहे. यावर पुणे दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार नाहीत. तसं कोणतंही नियोजन नाही.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. भाजपला लोकसभा निवडणुकीत बारामतीत कमळ फुलवायंचे आहे. त्यासाठी बारामतीवर लक्ष केंद्र केलं जातंय, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्रातील प्रत्येक मोठे नेते दौरा करत आहेत. मात्र माध्यमांचे बारामतीवर अधिक लक्ष आहे. त्यामुळेच तशा वावड्या उठवल्या जात आहेत.

पुणे जिल्हाच्या विभाजनाचा तूर्त तरी कोणताच प्रस्ताव नाही. योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल. आमच्याकडे नगर जिल्ह्याचे तीन वेगवेगळे प्रस्ताव आहेत. संभाजीनगरचा एक प्रस्ताव आहे. त्यामुळे लगेचच त्यावर निर्णय होतो असं होत नाही. पण योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

वज्रमुठ सभेची पुण्यात जय्यत तयारी सुरु आहे, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्यामध्येच वाद सुरु आहेत की सभेला कोणी कुठे बसायचं. आधी कोण बोलणार. मग कोण बोलणार, असे सर्व प्रकार त्यांच्यात सुरु आहेत. पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात योग्य ते लिहिलं आहे. परिणामी मी आता त्यांच्याविषयी काय बोलणार.

१६ आमदार अपात्र ठरतील की नाही यावर मी भाष्य करणार नाही. हा विषय सन्मानीय विधानसभा अध्यक्षांकडे आहे. ते कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेतलीच. पण एक कायद्याचा अभ्यासक म्हणून. तसेच गेली २५ वर्षे राजकारणात काम करतोय या नात्याने मी सांगेन की मविआला चांगलच माहिती आहे की पोपट मेला आहे. तरीही तो मान हलवत नाही. हात पाय हलवत नाही, असे ते सांगत आहेत. शेवटी त्यांनाही त्यांच्या लोकांना काही तरी सांगाव लागत. त्यामुळे ते अजूनही आशेवर आहेत, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.