बीड : बीडच्या राजकारणात मुंडे भगिनी या कायमच चर्चेचा विषय राहिलेल्या आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे त्यांना आज समाजात प्रतिष्ठेचे स्थान आहे, असे त्या दोघी कायमच सांगत असतात. परळी विधानसभेच्या माजी आमदार आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे या कायमच राजकारणात सर्वांच्या चर्चेचा विषय असतात. तर खासदार प्रीतम मुंडे या कायमच आपल्या कामात मग्न असलेल्या पाहायला मिळतात. परंतु आता प्रीतम मुंडे यांनी पदाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
हेही वाचा – पंकजा मुंडे पुन्हा उतरणार राजकीय आखाड्यात! सप्टेंबरमध्ये काढणार शिवशक्ती यात्रा
खासदार प्रीतम मुंडे या सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या आहेत. सध्या त्यांच्या कार्यकाळाला 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. परंतु त्यांच्या या कार्यकाळात त्या खूप कमी वेळा त्यांच्या मतदारसंघात आलेल्या आहेत. परंतु न येता देखील त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क हा उत्तम असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रीतम मुंडे या त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्या तरी लोकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येते. नुकतेच प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या म्हसोबाची वाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली. यावेळी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने जेसीबीवरून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलत असतानाच त्यांनी पदाबाबत वक्तव्य केले आणि त्या भावूक झालेल्या देखील पाहायला मिळाल्या. प्रीतम मुंडे या विकास कामांच्या कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा राजकीय वक्तव्य करणे टाळतात, परंतु या कार्यक्रमामध्ये त्यांनी अराजकीय वक्तव्य करत टोला लगावला आहे. (MP Pritam Munde became emotional while interacting with the public)
“आज पंकजाताई कुठल्याच मंत्रिपदावर नाहीत, आमदार खासदार हे पद येत जात राहते. पण मुंडे साहेबांची लेक हे आयुष्यभर पद राहणार आहे,” असे म्हणत त्या जनतेसमोर भावनिक झाल्या. तसेच, मी मुंडे साहेबांची बरोबरी नाही करू शकत. मात्र त्यांनी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून ज्या ज्या लोकांनी मला न पाहता ही दोन वेळेस निवडून दिले. त्या लोकांसाठी आता माझं कर्तव्य आहे, काहीतरी करण्याचे, असेही यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून राजकारणातून ब्रेक घेतलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या सप्टेंबरपासून पुन्हा सक्रिय होणार आहेत. परंतु सुरुवातीलाच त्या शिवशक्ती यात्रा काढणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून त्या केवळ देवदर्शन करणार असून यामध्ये राजकीय कोणतीही गोष्ट करण्यात येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपकडून वेळोवेळी डावलण्यात आलेल्या पंकजा मुंडे या खरचं दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर फक्त देवदर्शनासाठी ही यात्रा करणार आहेत का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.