मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळणार, खासदार राहुल शेवाळेंचा विश्वास

rahul shewale

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या साहित्य अकादमी येथे आयोजित केलेल्या विशेष बैठकीनंतर खासदार शेवाळे यांनी ही माहिती दिली. तसेच, याविषयी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही खासदार शेवाळे यांनी स्पष्ट केले.

खासदार शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीच्या साहित्य अकादमी येथे आयोजित केलेल्या बैठकीत अकादमीचे सचिव डॉ. श्रीनिवासन राव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधताना खासदार शेवाळे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

2014-15 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पाठारे यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालानंतर साहित्य अकादमीच्या वतीने सकारात्मक अहवाल तयार करून तो केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला सादर करण्यात आला होता. मात्र, एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले होते. तसेच शिफारस करणाऱ्या समितीचे काही सदस्य निवृत्त झाल्याने अहवाल सादर करण्यास विलंब झाला होता, असं राहुल शेवाळे म्हणाले.

मात्र, आता नव्या नियमानुसार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी साहित्य अकादमीच्या वतीने लवकरच सांस्कृतिक मंत्रालयाकडे अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर हा अहवाल अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला जाईल आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केंद्रीय शिक्षा मंत्रालयाच्या वतीने करण्यात येईल. केंद्राच्या या तिन्ही मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला जाईल, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला.


हेही वाचा : नानांनी सांगितल्यावर आवाज बारीक केलात, दम दिल्याच्या आरोपांवर फडणवीसांना जाधवांकडून प्रत्युत्तर