खासदार संजय राऊतांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांचं मुंबई विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. त्यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांचं ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतावेळी शिवसैनिकांसह शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, सुनील प्रभू आणि खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. योद्धा नावांच्या फलकांसह राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले. विमानतळ ते भांडुप रॅली काढून शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. दिल्लीतून संजय राऊत मुंबईत दाखल झाले. त्यावेळी माध्यमांसोबत पोलीस आणि कार्यकर्ते यांची लगबग पाहायला मिळाली.

संजय राऊत मुंबई विमान तळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, भाजपा नेते किरीट सोमय्यांचा भ्रष्टाचार पुराव्यासह बाहेर काढला. सोमय्यांकडे आता उत्तर असूच शकत नाही, म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला हे स्पष्ट असल्याचं राऊत म्हणाले. सोमय्यांच्या विक्रांत घोटाळ्यावर आता देशात चर्चा सुरू झाली आहे. विक्रांतसाठी मिळवलेल्या पैशातून सोमय्यांनी मनी लाँड्रिंग केलं, अस संजय राऊत म्हणाले.

आमच्यावर कितीही कारवाया करा, आम्ही तिघेही एकत्र आहोत. पुढची २५ वर्ष महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही. कुठल्याही संकटाला एकजुटीनं सामोरं जाणार आहोत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचं संकट ही आमच्यासाठी संधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीतून महाविकास आघाडी सरकार एकत्र आहे, हे स्पष्ट झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संजय राऊतांच्या मुंबईतील दादर येथील फ्लॅटवर ईडीने कारवाई केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी झालेल्या या कारवाईवेळी संजय राऊत दिल्लीत होते. मात्र, आज ते मुंबईत दाखल झाले असून किरीट सोमय्या यांची तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत.


हेही वाचा : ST Workers Strike: २२ तारखेनंतर निलंबन, बडतर्फ, सेवासमाप्तीची कारवाई कर्मचाऱ्यांवर करणार – अनिल परब