इंदापूर (पुणे) – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला वेगळे वळण मिळत असल्याचे दिसत आहे. आरोपींना फासावर लटकवत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. देशमुख हत्याकांडातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडचा आका कोण असा सवाल करुन धनंजय मुंडेंना अडचणीत आणणारे आमदार सुरेश धस यांनीच धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळ्या वळणावर संपवण्याचे षडयंत्र सुरु असल्याची चर्चा आहे. यावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे इंदापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मी ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप केले. त्याविरोधात राजकीय नैतिकतेच्या आधारावर सगळे पक्ष एकत्र येतील अशी मला अपेक्षा होती. मात्र सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे मला वाईट वाटत आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी दुर्दैवी
रेल्वेचे कुठेतरी मिसमॅनेजमेंट होत आहे. यात कोणाचीतरी चूक झाली आहे. त्यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. वारंवार रेल्वेच्या दुर्घटना होत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात दुर्घटना झाली होती. त्यानंतर आता राजधानी दिल्लीत चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे. व्यवस्थापनात काही तरी चूक झाली आहे, असा आरोप खासदार सुळे यांनी केला. देशातील गरीब, कष्टकरी यांचाच यामध्ये बळी जात आहे. हे दुर्दैवी आहे.
भविष्यात कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घेऊ
शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला यावरुन शिवसेना ठाकरे गट नाराज आहे. संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून सुसंस्कृतपणा येत नाही. त्यासाठी सुसंस्कृतपणा दाखवावा देखील लागतो. शिवसेनेचे काही नेत्यांबरोबर दिल्लीत चर्चा केली आहे. भविष्यात कोणीही दुखावलं जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असे खासदार सुळे म्हणाले.
आम्ही आर्थिक नियोजन केले होते…
महायुती सरकार लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थींचे निकष ठरवत आहे. सरकारने अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना वगळणार आहेत, यावर खासदार सुळे म्हणाल्या की, मला यात काही आश्चर्य वाटत नाही. लाडकी बहीण योजना निश्चित चांगली असून, आमचे सरकार आले असते तर आम्ही तीन हजार देणार होतो. आम्ही लाडकी बहीण योजनेत कोणालाही वगळले नसते तर कारण आम्ही आर्थिक नियोजन करून तीन हजार देणार होतो.
हेही वाचा : Bhaskar Jadhav : आता साहेब म्हणा की आरती ओवाळा; भास्कर जाधव योग्य वेळेची वाट पाहात आहे