नदीतले टॉवर, डोंगराळ भाग, रेल्वे क्रॉसिंगचे आव्हान, चक्रीवादळातही महापारेषणची जिद्द जिंकली

MSETCL team taukte cyclone

तोक्ते चक्रीवादळामुळे सतत कोसळणारा पाऊस आणि वेगवान वाऱ्याने अनेक यंत्रणांचे नुकसान केले. याच चक्रीवादळाच्या हवेच्या तीव्र जोरामुळे २२० के. व्ही. बॉम्बे डाईंग-सहारा वाहिनीच्या मनोऱ्याच्या वरच्या टोकाला असलेली अर्थ वायर वाहिनीवर पडली. सदरील दोन मनोऱ्यादरम्यान मोठी नदी होती. या परिस्थितीतही मुसळधार पावसातही महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच दुरूस्ती करून वाहिनी पूर्ववत केली. तर दुसरीकडे मुंबई परिसराला वीजपुरवठा करणारी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव ही वाहिनी १८ मे रोजी बंद पडली होती. भर डोंगरात या बिघाडामुळे फॉल्ट निर्माण झाला होता. उपकेंद्रात आढळलेल्या सुरक्षा प्रणालीनुसार सदरील बिघाड हा कळवा उपकेंद्रापासून ३८ किलोमीटर अंतरावर माथेरान येथील डोंगरादरम्यान होता. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री युध्दपातळीवर कामाचे नियोजन करून सकाळी वीजवाहिनी सुरू केली. ४०० के. व्ही. कळवा-पडघे या वाहिनीची अर्थवायर विद्युत तारावर पडून विद्युत वाहिनी बंद पडली. बिघाडाचे ठिकाण तळोजा रेल्वेक्रॉसिंगजवळ होते. तसेच चक्रीवादळामुळे झाडे पडल्याने रस्ते बंद होते. दरम्यान, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाशी तात्काळ संपर्क साधून भरपावसात अर्थ वायरचा अडथळा दूर केला. त्यामुळे ४०० के. व्ही. कळवा-पडघे ही वाहिनी पूर्ववत करण्यात आली.

२२० के. व्ही. टेमघर या उपकेंद्रात अतिवृष्टी व वादळामुळे रात्री दोन वाजता विद्युत उपकरणे नादुरूस्त झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करून रात्री साडेतीन वाजता टेमघर वाहिनी व उपकेंद्राचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला. पडघे, कळवा, कलरकेम, बोईसर, आपटा, उरण, कुडूस, डोंबिवली, वसई, ट्रॉम्बे, बोरिवली, नागोठाणे व इतर उपकेंद्रातील संबंधित अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत कठीण परिस्थितीतही ऑक्सीजन कारखाने, कोविड केंद्रे यांना विद्युत पुरवठा अखंडित ठेवला.

१०० के. व्ही. तळोजा येथून दोन वाहिन्या लिंडे ऑक्सिजन कारखान्यास वीजपुरवठा करतात. या दोन्ही वाहिन्या एकाचवेळी बंद पडून ऑक्सीजन कारखान्यास वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर अवघ्या ४५ मिनिटांत विद्युत पुरवठा पूर्ववत केला. चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी महापारेषणने योग्य प्रकारचे नियोजन व दक्षता घेतली होती. तसेच तिन्ही वीज कंपन्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील समन्वय व संपर्कामुळे वीजपुरवठा सुरळीत राखता आला, याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अभिनंदन केले आहे.