‘या’ तीन जिल्ह्यातून कोकणात ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे

mumbai-to-goa-coastal-route

उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने आता कोकणाकडे अधिक लक्ष केंद्रित करत ५०० ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेस वे तयार करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाच्या पावलावर पाऊल ठेवत आता कोकणातील ३ जिल्ह्यांमधून धावणारा असा ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेस वे च्या निमित्ताने हालचालींना वेग आलेला आहे.

राज्यातील पायाभूत सुविधा विकासाचे जाळे उभारणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी सल्लागारांची नेमणुक करण्यासाठीची निविदा प्रक्रिया एमएसआरडीसीने आता सुरू केली आहे. या सल्लागारांमार्फत प्रकल्प अंमलबजावणी अहवाल तसेच ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेस वे साठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल यासारख्या कामांचा समावेश आहे. याआधी मार्च महिन्यात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे तयार करण्यात येईल अशी माहिती दिली होती. त्यानुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याठिकाणाहून जाणारा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे कोकणासाठी तयार करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. रायगडमधील चिर्ले येथून या एक्सप्रेस वे साठी सुरूवात होईल या अनुषंगाने हा एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. चिर्ले येथे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा शेवट होणार आहे. एमटीएचएल प्रकल्पाअंतर्गत शिवडी ते न्हावाशेवा यादरम्यान २२ किमी अंतराचा सागरी सेतू उभारण्याचे काम सध्या एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. या एक्सप्रेस वे चा विस्तार सिंधुदुर्ग पर्यंत महाराष्ट्र गोवा सीमेपर्यंत असणार आहे. या प्रकल्पामुळे कोस्टल टुरीजम वाढेल आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ताण कमी होईल असे मत एकनाथ शिंदे यांनी याआधीच व्यक्त केले होते.

एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी ५५ हजार कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई ते नागपुर यादरम्यानचा प्रवास ८ तासांवर येणार आहे. एमएसआरडीसीने वर्सोवा वांद्रे लिंकसाठीही ७ हजार कोटी रूपयांची गुंतवणुक करत हा प्रकल्पदेखील हाती घेतला आहे. यापुढच्या टप्प्यात २४ हजार कोटी रूपये खर्च करून विरारपर्यंत हा प्रकल्प विस्तार करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे.