घरताज्या घडामोडीएसटीचा ड्रायव्हरला हवंय चीनच्या सीमेवर पोस्टिंग...  

एसटीचा ड्रायव्हरला हवंय चीनच्या सीमेवर पोस्टिंग…  

Subscribe

या संकटकाळात मला आत्महत्या करू द्या किंवा चीनच्या सीमेवर लढून मरण्याची परवानगी द्या अशी मागणी मुंबई सेंट्रल विभागाचे एसटी चालक आनंद हेलगांवकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मला दमा व मधुमेहाचा त्रास असल्याने या कोरोनाच्या संकटकाळात सेवानिवृत्तीची मागणी नियमानुसार एसटी महामंडळाकडे  केली होती. मात्र, ती विनंतीही आतापर्यंत मान्य झालेली नाही. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करत असताना सुद्धा मार्च महिन्यापासून आम्हाला सरकारी नियमांनुसार वेतन मिळालेले नाही. त्यामुळे माझ्यावर आणि कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. घरात आई कर्करोगाने ग्रस्त आहे. आईच्या शस्त्रकियेसाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मदतीसाठी अर्ज केला होता. मात्र, शस्त्रक्रियेसाठी मदत मिळालेली नाही. शासनाच्या योजनेच्या फायदा मिळत नसल्याने या संकटकाळात मला आत्महत्या करू द्या किंवा चीनच्या सीमेवर लढून मरण्याची परवानगी द्या अशी मागणी मुंबई सेंट्रल विभागाचे एसटी चालक आनंद हेलगांवकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र 

लॉकडाऊन काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करू नये, तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवू नयेत असे आदेश असतानासुद्धा एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही. राज्यातील इतर आगार व विभागांमधील कर्मचाऱ्यांना एसटीची सेवा बंद असताना पूर्ण महिन्याचा पगार देण्यात आला. त्यामुळे या तिन्ही विभागातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता तर एसटी कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन देत असल्यामुळे एसटी कामगारांच्या हातात अत्यल्प रक्कम मिळत असून घरखर्च भागवणेही अवघड जात आहे. त्यामुळे नाराज झालेले एसटी कर्मचारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली परिस्थिती मांडत आहे. मुंबई सेंट्रल विभागाचे एसटी चालक आनंद हेलगांवकर यांनी तर  मला आत्महत्या करू द्या किंवा चीनच्या सीमेवर लढून मरण्याची परवानगी द्या अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

- Advertisement -

 आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही

दैनिक आपलं महानगरशी बोलताना एसटी चालक आनंद हेलगांवकर यांनी सांगितले की, मी एसटी महामंडळात २१ वर्ष काम करत आहे. मला दमा व मधुमेह आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात मी सेवानिवृत्तीची मागणी एसटी विभागाकडे केली होती. मात्र, ती विनंतीही मान्य झालेली नाही. लॉकडाऊनमध्ये मी अत्यावश्यक सेवेत काम करत आहे. घरची परिस्थिती अत्यंत्य वाईट आहे. आईच्या उपचारासाठी पैसे नाही. शासनाच्या योजनेचा फायदा मिळत नाही. त्यामुळे मला आता आत्महत्या करण्याव्यतिरिक्त पर्याय उपलब्ध नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

- Advertisement -

..तर माझे मरण सत्कारणी 

सरकारच्या दुर्लक्षामुळे एसटी महामंडळाची दुर्दशा झाली आहे. एसटी कामगारांना वेतन नाही, एसटीत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थिती एसटी महामंडळाकडून सुविधा मिळत नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. तरी सुद्धा आपली सेवा एसटी कर्मचारी देत आहे, त्यामुळे सरकारने त्यांच्याकडे  लक्ष देणे गरजचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करू द्या अशी विनंती केली आहे. अन्यथा  सीमेवर चीनशी युद्ध करण्यासाठी मला पाठवावे जेणेकरून तिथे माझे मरण सत्कारणी लागेल, अशी विनंतीही मी त्यांना केली आहे,असे एसटी चालक  आनंद हेलगांवकर म्हणाले

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -