घरताज्या घडामोडीलाल डबा नव्हे तर लालपरी म्हणा....

लाल डबा नव्हे तर लालपरी म्हणा….

Subscribe

महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रमुख भूमिका निभावणाऱ्या एसटीला जर लाल डबा म्हणून संबोधले जात असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे.

सर्वांच्या सुख-दु:खात साथ देणारी, ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचा वाटा असणारी ग्रामीण भागाची लाडकी लालपरी अर्थात एसटी कोरोना काळात आपली सेवा देत आहे. मात्र गेल्या काही दिवसांत आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व मानाच्या पालख्या व पादुका एसटी महामंडळाच्या बसेसमधून मोफत आणण्यात येतील असे, शासनाने आदेश दिले होते. त्यांवरून अनेक राजकीय पुढाऱ्यांनी चक्क एसटी बसेसला लाल डबा संबोधून एसटीला हिणविण्याचे काम केले आहे. त्यामुळे  महाराष्ट्रातील एसटी प्रेमीं आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. यानंतर एसटीला लाल डबा संबोधल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा चक्क इशारा महाराष्ट्र एसटी काँग्रेस संघटनेकडून देण्यात आलेला आहे.

अपमानाविरोधात एसटी प्रेमी उतरणार रत्यावर

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरीने शहरी भाग ते ग्रामीण भाग तसेच महानगर पर्यंत जाऊन लोकांची ने-आण करत आहे. शहरी भाग, तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात आजही एसटीचा  लोकांना  विश्वासाचा आधार आहे. फक्त एसटीचाच…एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास, असा नारा सरकारने दिला किंबहुना तिला बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंही म्हटलं गेलं आहे. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत असो किंवा सध्याची सुरु असलेली कोरोना आरोग्य आपत्ती असो एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या तसेच गोरगरीब आणि वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहे. राज्यातील अनेक राजकीय नेते आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी एसटीने प्रवास करत आपले करियर घडवले. मात्र  सरकार विरोधात आंदोलन होते तेव्हा सुद्धा एसटीच्या बसेसवर दगडफेक करून, काचा फोडल्या जातात. आता तर चक्क राज्यातील  राजकीय पुढाऱ्यांकडून लाल डबा म्हणून तिला हिनवले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. यानंतर आम्ही खपवून घेणार नाही  असा इशारा राज्यातील एसटी प्रेमींनी सरकारला दिला आहे.

- Advertisement -

राजकीय पुढाऱ्यांचा निषेध

दरवर्षी आषाढी एकादशीला  लाखो वारकरी बंधूंची सेवा करण्याचे  दायीत्व एसटीने अगदी जबाबदारीने पार पाडले आहे. यंदा माऊलीच्या मानाच्या पालख्या नेण्याचे भाग्य एसटीला मिळाले, हा एसटीचा आम्ही बहुमान समजतो. यंदा राज्यभरातील विविध तिर्थक्षेत्रांवरून आषाढी एकादशीला परंपरेने चाललेल्या  मानाच्या पालख्या व  मानाच्या पादुका  या थेट पंढरपूर मध्ये आणण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळावर जबाबदारी टाकली होती. त्यानुसार मानाच्या  पालख्या एसटीच्या शिवनेरी, शिवशाही ,लालपरी अशा विविध बसेसमधून  निवडक वारकरी बंधूंसह पंढरपूरकडे सुखरूप पोहचवले आहे. वाटेत सर्वसामान्य जनतेने या पालख्यांचे दर्शन घेत फुले वाहिली. मात्र एसटीतून पालखी घेऊन जाण्यावरून जे राजकारण झाले. ते फार दुर्दैवी आहे. अनेकांनी चक्क लाल डबा संबोधून ग्रामीण भागातील एसटीला हिनवले आहे. अशा राजकीय पुढाऱ्यांचा आम्ही निषेध करतोय, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

लालपरी म्हणा..

महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रमुख भूमिका निभावणाऱ्या एसटीला जर लाल डबा  म्हणून संबोधले जात असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. आज या एसटीच्या इतिहासात डोकावून पाहिले तर या एसटीने अनेक खस्ता खाऊन अनेक क्षेत्रांत सेवा दिली आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आमदार, नट यांसारखे अनेक लोकांना एसटीने घडवले असून या सर्वांनी वेळोवेळी याची जाण देखील ठेवली असताना काही संकुचित बुद्धी असणारे आज देखील एसटीची लाल डबा  म्हणून अवहेलना करताना दिसून येत आहे. एसटीत अनेक बदल झाले असताना देखील एसटीत  अनेक उणिवा आहेत, हे एक प्रवासी तसेच एक एसटी प्रेमी म्हणून   १००% मान्य करतो. ज्याप्रमाणे माणूस परिपूर्ण नसतो अगदी त्याचप्रमाणे संस्था देखील परिपूर्ण नाही हे मान्य आहेच, पण याचा अर्थ असा नाही की तिची अवहेलना करावी. तळागाळातील लोकांना सेवा देणारी एसटी हा समाजाचा एक महत्वपूर्ण अंग असून तिच्या परिपूर्णतेसाठी आपण सर्वांनी मिळून हे काम केले पाहीजे. अशी प्रतिक्रिया  बस फॉर अस फाउंडेशनचे अध्यक्ष  रोहित धेंडे यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना दिली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -