घरमहाराष्ट्र22 एप्रिलपासून एसटी सेवा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न; मंत्री अनिल परब यांची माहिती

22 एप्रिलपासून एसटी सेवा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न; मंत्री अनिल परब यांची माहिती

Subscribe

येत्या २२ तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने तसेच कर्मचऱ्यांचा संप संपुष्टात आल्याने आता लालपरीला पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत एसटीचे कोणते मार्ग सुरू करायचे आणि किती गाड्या सुरू करायच्या यावर चर्चा करण्यात आली.

एसटी महामंळाच्या कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची मागणी फेटाळत २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गेली साडेपाच महिने सुरू असलेला संप आता निकाली निघाला आहे. न्यायालयाच्या या दणक्याने एसटी कर्मचारी कामावर हजर होतील याची खात्री राज्य सरकारला आहे. त्यामुळे २२ तारखेपासून एसटी वहातूक पूर्वपदावर आणण्याचे नियोजन सुरू झाले आहे.

- Advertisement -

अनिल परब यांनी आज एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीनंतर बोलताना परब म्हणाले, आधी कोरोना आणि नंतर संपामुळे एसटी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कोणते मार्ग सुरू करायचे आणि कोणकोणत्या मार्गावर प्राधान्याने वाहतूक सुरू करायची यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. अनेक बस गाड्या या बंद असल्यामुळे त्या नादुरूस्त झाल्या आहेत. त्यांची दुरस्तीही हाती घ्यावी लागणार आहे. एकंदरच लवकरच एसटी वाहतूक पूर्वपदावर कशी येईल आणि राज्यातील जनतेला दिलासा कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहे.

एसटी संप काळात ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात येणार आहे. मात्र जे कर्मचारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले. एसटीच्या कायद्यामध्ये एखादा कर्मचारी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असेल तर त्याच्याविरुद्ध अशी कारवाई करण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला त्याचे सूत्रधार गुणरत्न सदावर्ते हेच आहेत. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकून हा हल्ला घडवून आणला. त्यामुळे त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांना तुमचे शासकीय सेवेत विलीनीकरण करून देतो म्हणून त्यांच्याकडून वसुली करण्यात आली आहे. एसटीचे सुमारे एक लाख कर्मचारी असून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे काही कोटी रुपये गोळा केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या वसुलीचीही चौकशी केली पाहिजे, असे परब म्हणाले.


Money Laundering : अनिल देशमुख, सचिन वाझे, संजीव पालांडेंसह कुंदन शिंदेला 16 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -