घरताज्या घडामोडीचाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात ४ सप्टेंबरपासून २२०० जादा बसेस

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात ४ सप्टेंबरपासून २२०० जादा बसेस

Subscribe

१६ जुलैपासून बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकांतून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तसेच १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलैपासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी बुधवारी दिली.

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. ‍एसटी, गणपती आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. यंदा मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यांवर धावतील, असे मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.

- Advertisement -

गणेशोत्सवासाठी ४ ते १० सप्टेंबरदरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर १४ ते २० सप्टेंबरदरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

- Advertisement -

७२ गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण फुल्ल

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने ७२ गणपती स्पेशन ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या गाड्यांचे सुरू केलेले आरक्षण अवघ्या काही दिवसांतच फुल्ल झाले. गणपती स्पेशन ट्रेन सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी -रत्नागिरी, पनवेल-सावंतवाडी आणि पनवेल-रत्नागिरीदरम्यान चालवण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -