Property tax exemption : मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी, राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

Mantralaya_2

मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीच्या निर्णयाला राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य मंत्रीमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर होते. ५०० चौरस फुटांपर्यंतचा निर्णय हा बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ४६.४५ चौ.मी. (५०० चौ.फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी वापरकर्ता प्रवर्ग असलेल्या मालमत्तांना मालमत्ता करामधून सवलत देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. नगरविकास विभागाच्या वतीने हा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळासमोर मांडण्यात आला होता.

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोडांवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या वर्षात निर्णयाचा सपाटा लावत मुंबईकरांच्या दृष्टीने महत्वाचा असा मालमत्ता कराचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला. मालमत्ता कर माफीच्या प्रस्तावाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूरी देण्यात आली. मुंबईनुसारच ठाण्यातील घरांनाही मालमत्ता कर माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ जानेवारी २०२२ पासून करण्यात येणार असून त्याचा लाभ मुंबईतील १६.१४ लाख निवासी मालमत्ताधारकांना होणार आहे. शिवसेनेने २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपल्या आश्वासनाची पूर्ती केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जानेवारी,ल २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार ४६.४५ चौ.मी. (५०० चौ. फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार आज मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. या सवलतीमुळे मुंबई महापालिकेच्या कर महसुलात सुमारे ४१७ कोटी आणि राज्य सरकारच्या महसुलात ४५ कोटी असा एकूण ४६२ कोटींचा महसूल कमी होणार आहे.

ठाणेकरांचाही मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर

मुंबईनुसारच ठाण्याला ही मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव हा राज्याच्या मंत्रीमंडळासमोर आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यामुळे मुंबईनुसारच ठाणेकरांनाही ५०० चौरस फुटांच्या घरांसाठी आगामी काळात मालमत्ता करात दिलासा मिळू शकतो असेही त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील घरांसाठी हा निर्णय लवकरच घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय…

• छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व दंडावरील संपूर्ण व्याज माफ करून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास मान्यता
• बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ४६.४५ चौ.मी. (५०० चौ.फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या “निवासी” हा वापरकर्ता प्रवर्ग असलेल्या मालमत्तांना मालमत्ता करामधून सवलत
– मंत्री एकनाथ शिंदे
नगर विकास विभाग
——
• पायाभूत सुविधांची कामे वेगाने होण्यासाठी आता दिवसाप्रमाणे रात्री देखील गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक करण्यास मान्यता
• गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व मृतभाटकाच्या दरात सुधारणा
• मौजे आंबिवली येथील जमीन “शांताबाई केरकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टला” मॅटर्निटी होम व डिस्पेन्सरीसाठी भुईभाडयाने प्रदान करण्यास मान्यता.
– मंत्री बाळासाहेब थोरात
महसूल विभाग
——
• महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान ३% इतका निधी कायमस्वरुपी उपलब्ध करून देणार
मंत्री यशोमती ठाकूर
महिला व बाल विकास विभाग
——
• कोविड- १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणा-या स्कूल बसेसना वाहन करातून १००% सूट देण्याचा निर्णय
– मंत्री अनिल परब
परिवहन विभाग
—–
• दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक
– मंत्री हसन मुश्रीफ
कामगार विभाग
—–
• साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुंबई महामंडळाकडून राष्ट्रीय मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ, दिल्ली यांची थकीत वसुली ८८.२४ कोटी रक्कम भरणा करण्यास मान्यता.
– मंत्री धंनजय मुंडे
सामाजिक न्याय विभाग
—–
• बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे मनोविकृती शास्त्र, बालरोग चिकित्सा शास्त्र तसेच स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ९ अध्यापकीय पदांची निर्मिती.
– मंत्री अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षण विभाग