Homeमहाराष्ट्रMumbai BMC : इमारतीवर नवीन बांधकाम करणार्‍यांवर कारवाई करा, पालिकेने दिले आदेश

Mumbai BMC : इमारतीवर नवीन बांधकाम करणार्‍यांवर कारवाई करा, पालिकेने दिले आदेश

Subscribe

मुंबई : मुंबईतील वाढत्या अतिक्रमणाबाबत न्यायालयाने चपराक दिल्यानंतर मुंबई महापालिका खडबडून जागी झाली. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महापालिकेत अतिक्रमण प्रतिबंधक समितीची बैठक पार पडली. मुंबईत दुरुस्तीच्या नावाखाली इमारतींवर नव्याने बांधकामे करण्यात येत आहेत, अशी खळबळजनक माहिती यावेळी बैठकीत उजेडात आली. सर्वच अतिक्रमणाबाबत गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी, मुंबईतील अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्वसमावेशक प्रणाली विकसित करावी. तसेच, अतिक्रमण विरोधात कडक कारवाई करावी, असे निर्देश सर्वच प्राधिकरणांना दिले. (Mumbai Additional Commissioner Dr Ashwini Joshi ordered to take action)

हेही वाचा : Siddhartha Hospital : सिद्धार्थ रुग्णालयाच्या कामाला गती द्यावी, आयुक्तांचे निर्देश  

मुंबईत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फटकारले. त्यामुळे पालिका यंत्रणा जाग्या झाल्या. अतिक्रमण निर्मूलन विषयक कार्यवाहीच्या अनुषंगाने मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली अतिक्रमण प्रतिबंधक समितीची बैठक गुरुवारी मुंबई महापालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी डॉ. अश्विनी जोशी यांनी हे निर्देश दिले. यावेळी, मुंबई महापालिकेच्या विविध परिमंडळांचे उपआयुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह म्हाडा, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, पोलीस, मिठागरे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आदी संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीत सर्वप्रथम सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) मृदुला अंडे यांनी संगणकीय सादरीकरण केले. तसेच, अतिक्रमणासंदर्भातील विविध मुद्यांचा आढावा घेण्यात आला.

सर्व यंत्रणांनीही डिजिटल प्रणाली तयार करावी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे प्रत्येक यंत्रणांनी पालन करावे. मुंबईतील विविध यंत्रणांच्या अखत्यारित असलेल्या भूखंडांवर होणारे अतिक्रमण काढण्यासाठी सर्वसमावेशक प्रणाली असायला हवी. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर अन्य सर्व यंत्रणांनीही डिजिटल प्रणाली तयार करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सर्वच यंत्रणांना दिले. विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या अतिक्रमण कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल व्यवस्थितपणे ठेवावा आणि वेळोवेळी महापालिका आयुक्त यांना सादर करावा, असे त्यांनी निर्देश दिले.


Edited by Abhijeet Jadhav