मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मुंबईत २४ तासात ६७६ तर राज्यात १ हजार कोरोनाबाधितांची नोंद

कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर राज्यात मास्क सक्ती करण्यात येईल असे सूचक वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा केलं आहे. यामुळे टास्क फोर्सच्या बैठकमध्ये काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

mumbai and maharashtra corona update
मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मुंबईत २४ तासात ६७६ तर राज्यात १ हजार कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात आणि मुंबईत कोरोनाबाधितांची नोंद झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासात मुंबई पालिका क्षेत्रामध्ये ६७६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर राज्यात १ हजार ३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत नव्या रुग्णांपैकी केवळ ५४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ६२२ रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत. मुंबईत गेल्या २४ तासात ६ हजार ८९७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या पैकी ६७६ कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

मुंबईत सध्या ५ हजार २३८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर गेल्या २४ तासात ३१८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केला आहे. मुंबईचा कोरोना बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर १०५१ दिवसांवर पोहोचला आहे.

राज्यात गेल्या २४ तासात १ हजार ३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सध्या ७ हजार ४२९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३१ टक्क्यांनी वाढली आहे. तर १५ हजार ९८८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या यातील १ हजार ३६ चाचण्यांचा अहवाल कोरोना सकारात्मक आला आहे. राज्यात पुणे, ठाणे, मुंबई, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होत आहे.

मास्क सक्तीबाबत लवकरच निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससोबत राज्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीवर बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मास्क सक्ती आणि कोरोना निर्बंध याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान या बैठकीनंतर मास्क सक्तीबाबत माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. परंतु गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर राज्यात मास्क सक्ती करण्यात येईल असे सूचक वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा केलं आहे. यामुळे टास्क फोर्सच्या बैठकमध्ये काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा : राज्यात पुढील ५ दिवसांमध्ये तीव्र पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा