13 years of 26/11: राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन

Mumbai attack Maharashtra Governor, Dy CM pay tribute to martyrs of 26 /11 terrorist attacks
13 years of 26/11: राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून १३ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी आणि पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. त्यानंतर राज्यपालांनी तेथे उपस्थितीत हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री शंभू राजे देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबईवरील २६/११ (२००८) दहशतवादी हल्ल्यावेळी शहराचं रक्षण, नागरिकांचा जीव वाचवताना मुंबई पोलीस, एनएसजी, गृहरक्षक,अग्निशमन दल,सर्वच सुरक्षा दलांचे अधिकारी आणि जवानांनी असामान्य धैर्य, शौर्य, पराक्रमाचं दर्शन घडवलं. या हल्ल्यातील शहीद वीरांचं स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली. यापुढच्या काळात शहरातील पोलीस दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या संदर्भात जागतिक तोडीचं असेल. पोलिसांचं मनोबल सदैव उंच राहील. जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस दल ही प्रतिमा अधिक ठळक होईल, यासाठी शासन आणि नागरिकांनी मिळून प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करतो.