म्हणून मी भाजप प्रवेश केला, कृपाशंकर सिंह यांनी सांगितले कारण

Kripashankar singh joined BJP

आज अनेकांना थोडस वेगळ वाटत असेल पण कॉंग्रेसमध्ये राजकीय करिअर केल्यानंतर आज मी भाजप प्रवेश करत आहे. अनेकांचे मला भाजप प्रवेश कधी करणार यासाठीचे फोन गेल्या काही दिवसात येत होते. पण माझे एकच उत्तर होते, ते म्हणजे जेव्हा भाजप पक्षाला वाटेल तेव्हा मी भाजप प्रवेश करेन. त्यानुसारच मी गेले अनेक दिवस धीर धरला आणि अखेर भाजप प्रवेशाचा तो दिवस आज उजाडला असल्याचे मत उत्तर भारतीय समाजाचे मुंबईतील जेष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी काही दिवसांपूर्वी भेटलो होतो, या भेटीनंतरच यापुढच्या काळात राजकारण करणार ते भाजपकडूनच करणार असे मी मनोमन निश्चित केल्याची कबुलीही कृपाशंकर सिंह यांनी दिली. गेल्या २१ महिन्यांमध्ये कॉंग्रेसचा त्याग करत मी कलम ३७० वर जनजागृती करत अखंड भारताच्या संकल्पेनेबाबत जनजागृती केली. कॉंग्रेसमध्ये मला जे हव ते बोलता आले असते पण भाजपमध्ये मात्र जपून बोलावे लागेल असे कृपाशंकर सिंह यावेळी म्हणाले.

अमित शहा यांनी कलम ३७० वर केलेले भाषण मला आजही आठवते. त्यामध्ये गरज पडल्यास जीवही देऊ असे विधान अमित शहा यांनी केले होते. या प्रेरणादायी भाषणामुळेच मला भाजपमध्ये काम करण्यासाठीची स्फुर्ती मिळाली. गेल्या २१ महिन्यांच्या काळात कोणताही राजकीय पक्ष निवडेन असे काहीच निश्चित केले नव्हते. पण गेल्या काही दिवसांमधील भाजपच्या नेतृत्त्वातील घडामोडींनी माझे मन भाजप प्रवेशासाठी वळवले. भाजपकडून मुंबई महापालिका क्षेत्रातील असो वा अन्य कोणतीही जबाबदारी असो येत्या काळात ही जबाबदारी मी स्विकारने असेही कृपाशंकर सिंह यांनी सांगितले. मुंबईतील उत्तर भारतीय नक्कीच भाजपला आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये पाठिंबा देतील असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

फडणवीसांचा कृपाशंकर सिंह यांना फोन 

कृपाशंकर सिंह हे कॉंग्रेस सारख्या पक्षात अतिशय निष्ठेने काम करत असतानाच, एक विचारधारा सोडून वेगळ्या विचार धारेत केलेला प्रवेश असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत वर्षानुवर्षे कॉंग्रेसची विचारधारा होती, ज्यावेळी ३७० चा मुद्दा मांडण्यात आला तेव्हा कॉंग्रेसने या भूमिकेला विरोध केला. कृपाशंकर सिंह यांनी पत्र लिहून या कलमासाठीसाठी आणि देश एकसंघ असण्याच्या मुद्द्यावर पाठींबा दिला. हे पत्र माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः फडणवीस यांना फोन केला होता, तेव्हा देशाला एकसंघ करण्याचे काम मोदीजी करत आहेत, अशीही भावना त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी २१ महिने कलम ३७० च्या जनजागृतीचे काम केले. जवळपास २ वर्षांनी त्यांनी भाजप प्रवेश हा राष्ट्रीयतेचा, राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांमध्ये कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला नक्कीच फायदा होईल असेही फडणवीस म्हणाले.