मुंबई : मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली आणि निकाल रात्री उशिरापर्यंत घोषित झाले, मात्र या निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि महापालिकेचे चार अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, 60 हजार अधिकारी, कर्मचारी काही महिने अगोदरपासून राबले. 25 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता संपली. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी, ’हुश्श सुटलो एकदाचे बुवा ’ असे म्हणत सुटकेचा निःश्वास सोडला, मात्र निवडणूक कामकाजातून मिळणार हा सुटकेचा निःश्वास कदाचित तात्पुरता असू शकेल. कारण की, लवकरच मुंबईसह राज्यभरातील इतर शहरांतील महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आदींना जुंपण्यात येईल, असे सूत्रांकडून समजते. त्यामुळे सदर पालिका अधिकारी, कर्मचारी यांना विविध महापालिकांच्या निवडणुकीबाबत तारखा अंतिम होईपर्यंत विश्रांती मिळेल. त्यांनतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या कामाला लागावे लागणार आहे.
हेही वाचा : Dombiwali : डोंबिवली पश्चिमेतील वाहतूक कोंडीवर उपाय
लोकसभेसाठी मे 2024 मध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळी काही महिने अगोदरच मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी जुंपण्यात आले होते. त्यावेळी निवडणूक कामासाठी गेलेले काही अधिकारी, कर्मचारी विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत पालिकेत परतले नव्हते. ते पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले. आता विधानसभा निवडणूक पार पडली. अगदी आचारसंहिता सुद्धा 25 नोव्हेंबर रोजी संपली. त्याची अधिकृत घोषणासुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जुंपलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना कुठेतरी थोडी फुरसत मिळाली. त्यांनी हुश्श म्हणत सुटकेचा निःश्वास सोडला, मात्र सत्तेवर आलेल्या भाजपच्या व इतर काही पक्षांच्या नेत्यांकडून लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीबाबत सुतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महापालिकेच्या अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना जुंपले जाईल, हे निश्चित. त्यासाठी या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनीही निवडणूक कामकाज करावेच लागेल, अशी धारणा ठेवून मनाची पूर्व तयारी करावी लागणार आहे. मात्र तोपर्यंत तरी त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.