मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय कार्यालयांसाठी ‘100 दिवसांचा कृती आराखडा’ निश्चित केला आहे. त्यात स्वच्छताही अंतर्भूत असून पालिकेच्या 24 प्रशासकीय विभागात ‘कचरा मुक्त तास (Garbage Free Hour)’ ही विशेष मोहीम राबवणार आहे. रेल्वे स्थानक परिसर (पूर्व आणि पश्चिम), धार्मिक स्थळे, बाजारपेठा / निवासी क्षेत्र / वाणिज्यिक क्षेत्र, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी बुधवारी 15 जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार, सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. (Mumbai BMC lanches Garbage Free Hour’ Initiative )
हेही वाचा : Walmik Karad : वाल्मिक कराडला मकोका; बजरंग सोनवणे म्हणाले, मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे
या मोहिमेत लोकप्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, बिगर शासकीय संस्था (एनजीओ), राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. या मोहिमेच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक मंगळवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी, सह आयुक्त (परिमंडळ 4) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (परिमंडळ 5) देवीदास क्षीरसागर, उप आयुक्त (परिमंडळ 7) डॉ. भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (परिमंडळ 1) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ 2) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (परिमंडळ 3) विश्वास मोटे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उप आयुक्त (परिमंडळ 6) संतोषकुमार धोंडे, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) शरद उघडे यांच्यासह प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
या मोहीम अंतर्गत, घाटकोपर, चर्चगेट, कुलाबा, दादर, कुर्ला, मुलुंड, मालाड, अंधेरी, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, दहिसर, भायखळा, लालबाग, परळ, करी रोड, मशिद बंदर, गिरगाव आदींसारख्या ठिकाणी असलेल्या खाऊ गल्लयांमधील दैनंदिन स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार आहे. मुंबईत असणारी विविध कार्यालये तसेच पर्यटकांचा ओढा असलेल्या परिसरांमध्ये खाऊ गल्ल्या विशेषत्वाने आहेत. तसेच, स्वच्छता केल्यानंतर संबंधित परिसर नेहमी स्वच्छ राखण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील. या सूचनांचे पालन न करणाऱ्या/उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेदेखील डॉ.अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.
उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर म्हणाले की, कचरा मुक्त तास (Garbage Free Hour) या मोहिमेसाठी अंमलबजावणी आराखडा तयार करण्यात आला आहे. विभागांचे साहाय्यक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन विभाग) आणि संबंधित परिमंडळ कार्यकारी अभियंता मोहिमेचे वेळापत्रक निश्चित करतील. परिमंडळ कार्यकारी अभियंता साप्ताहिक कार्यक्रमासाठी कार्यक्षेत्रातील भागांची निवड करतील. सहभागी सर्व कर्मचारी गणवेश, संरक्षणात्मक उपकरणे आणि आवश्यक साधनांनी सज्ज असतील. सकाळी 11 वाजता नियोजित क्षेत्राची स्वच्छता केली जाईल. साचलेली धूळ तसेच पाणी साचण्याची ठिकाणे स्वच्छ केली जातील. नंतर रस्ते, पदपथ आणि भिंती इत्यादी सर्व संयंत्रे, टँकरच्या सहाय्याने स्वच्छ केल्या जातील, असे ते म्हणाले.