मुंबई : दिल्लीतील प्रदूषणाने कहर केला आहे, मात्र मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने इमारत बांधकामांना प्रदूषण टाळण्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशा आशयाच्या तब्बल पाच हजार नोटिसा पाठवल्या आहेत. जर प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरल्यास संबंधित इमारत बांधकामे बंद पाडण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. (Mumbai BMC Notices issued to 5000 construction projects in Mumbai takes action)
हेही वाचा : Reservation : सारे काही आरक्षणासाठीच…सर्वोच्च न्यायालयाने महिलेला का फटकारले?
मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारती बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे हवेतील प्रदूषणात भर पडते. हे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध प्रकारचे 27 नियम बनविले आहेत. इमारत बांधकामाला सुरुवात करताना सभोवताली किमान 35 फूट उंच लोखंडी पत्र्याची, अथवा ताडपत्र्यांची उभारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, धुळीचे प्रदूषण टाळण्यासाठी पाण्याचा मारा करणे, सभोवताली पाणी फवारणे आदी उपाययोजना करण्यास सांगितले आहे, मात्र अनेक ठिकाणी पालिकेच्या नियमांचे पालन करण्यात येत नाही. तसेच, सदर नियमांचे उल्लंघन सर्रासपणे करण्यात येते. जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्याने पालिकेने पावसाळा संपेपर्यंत झाडाझडती व कारवाई सुद्धा थांबवली होती, मात्र आता मुंबई महापालिकेने पावसाळा संपल्याने पुन्हा एकदा प्रदूषण रोखण्यासाठी डोके वर काढले आहे.
पावसाळा संपताच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी, लागलीच प्रदूषण नियंत्रणासाठी पुन्हा एकदा प्रदूषण संदर्भात नियमावली जारी केली. महापालिका पथक मुंबईत सर्वत्र सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी भेट देणार असून इमारत बांधकामांची झाडाझडती घेणार आहे. जे बिल्डर इमारत बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणार नाहीत. त्यांना अगोदर नोटिसा पाठविण्यात येणार असून त्यानंतरही त्यांनी त्याबाबत हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.