Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMumbai BMC : लिपिक पदाच्या 1846 पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वाचा...

Mumbai BMC : लिपिक पदाच्या 1846 पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वाचा सविस्तर…

Subscribe

राज्यामधील विविध शहरांतील केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार असून या संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे.

मुंबई : विधानसभा निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. आचारसंहिताही 25 नोव्हेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर महायुतीकडून सत्ता स्थापन होण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री बसणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. पण, मुंबई महापालिकेने विधानसभा निवडणूक पार पडल्याबरोबर लगेचच पालिकेच्या विविध खात्यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदासाठी 2 ते 6 डिसेंबर दरम्यान तसेच 11 आणि 12 डिसेंबरला परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या परीक्षेमध्ये पात्र ठरणारे उमेदवार हे सर्व प्रकारच्या कागदोपत्री तपासणी अखेर महापालिकेत लिपिक पदावर काम करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही कालावधीपासून 1846 लिपिक पदे रिक्त राहिल्याने त्याचा पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर विपरित परिणाम होत होता. पण आता लिपिक पदावर नव्याने पात्र उमेदवार आपले काम करण्यासाठी पालिका सेवेत दाखल होणार आहेत. (Mumbai BMC recruitment 2024 exam dates for 1846 clerk posts announced)

हेही वाचा : Jitendra Awhad : आता जनआंदोलन उभे करावे लागेल, आव्हाडांचा ईव्हीएमविरोधात संताप 

- Advertisement -

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये असलेल्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावेत आणि वेळापत्रकानुसार संबंधित केंद्रावर निश्वित वेळेत उपस्थित राहावे, असे महापालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून 20 ऑगस्टपासून 9 सप्टेंबर 2024 दरम्यान तसेच सुधारित जाहिरातीनुसार, 21 सप्टेंबर 2024 पासून 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते.

सदर अर्ज प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान तसेच 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली. या कालावधी दरम्यान रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. या ठिकाणी उमेदवाराने केलेल्या अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉगिन करता येणार आहे. लॉगिन केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. प्रवेश पत्रावर उमेदवारांसाठी परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील कार्यवाही करावी. दरम्यान, उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी 95132 53233 हा मदत सेवा क्रमांकही जारी करण्यात आलेला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत (1.30 ते 2.30 वाजेपर्यंतचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महापालिका प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -