घरताज्या घडामोडीतर मुंबई शहर राहण्यास अयोग्य ठरेल, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली भीती

तर मुंबई शहर राहण्यास अयोग्य ठरेल, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली भीती

Subscribe

‘मुंबईच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करतानाच वातावरण बदलांबाबतची कृती मुख्य प्रवाहात आणल्यामुळे शहरातील नैसर्गिक रचनेचे संरक्षण, संवदेनशील समूहाची सक्षमता वाढवणे आणि शहराची समृद्ध वाढ होणे शक्य होऊन शहरातील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात प्रभावी घट करता येईल.’ असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. आत्ता हीच वेळ कृती करण्याची असून, त्यात दिरंगाई झाली तर पुढील दशकभरात मुंबई शहर राहण्यासाठी अयोग्य ठरेल, असे आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. वातावरण बदलाचे आव्हान हाताळण्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक असे धोरण तयार करणे हे या आराखड्याचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे ठाकरे यांनी यावेळी मांडले. त्यासाठी वातावरण बदलाचे धोके कमी करणारे ठोस, प्रभावी आणि सर्वसमावेशक असे अनुकूल धोरण स्वीकारले जाईल.

वातावरण बदलाच्या परिणामांचे सर्वाधिक धोके असलेल्या शहरांपैकी मुंबई एक शहर असल्याने, मुंबईचा पहिला वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. हा आराखडा भविष्याचे अधिक चांगले नियोजन आणि वाढ राखत, वातावरणाशी अनुकूलता, धोके कमी करणे आणि सक्षमतेची खात्री देतो.

- Advertisement -

डिसेंबर २०२० मध्ये मुंबई सी ४० शहरांच्या जाळ्यामध्ये (सी ४० सिटी नेटवर्क) सहभागी झाले असून शहराचा वातावरण कृती आराखडा २०२१ च्या अखेरीस तयार होईल. सी ४० ची मार्गदर्शक तत्त्वे आणि महत्वाकांक्षी निकषांना अनुसरुन हा आराखडा तयार होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय) यांच्या तांत्रिक सहकार्याने हा आराखडा विकसित करत आहे. डब्ल्यूआरआय हे यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून कार्यरत आहेत.

तज्ज्ञ आणि नागरिकांकडून सूचना स्वीकारण्यासाठी शुक्रवारच्या कार्यक्रमात ठाकरे यांनी मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या (एमकॅप) संकेतस्थळाचे उद्घाटन केले. याद्वारे तज्ज्ञ आणि नागरिक त्यांच्या सूचना, शिफारशी २० सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवू शकतील. मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या अंतर्गत असलेले संकल्पनाधारीत सहा कृती मार्ग, उपाय नोव्हेंबर 2021 पर्यंत म्हणजेच संयुक्त राष्ट्रे वातावरण बदल परिषदेच्या (युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉनफरन्स – COP26) नजीकच्या काळात तयार होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

मुंबई वातावरण कृती आराखडा

हा आराखडा सहा प्रकारच्या कृती मार्गांवर, उपायांवर लक्ष्य केंद्रीत करतो. ज्यायोगे विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने धोके कमी करणाऱ्या अनुकूल अशा विशिष्ट धोरणामुळे अंमलबजावणी करण्याजोगे वातावरण प्रकल्प शहराच्या सक्षमतेत मदत करतील. घन कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, शहरातील हिरवळ आणि जैवविविधता, शहरातील पूर आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन, उर्जा कार्यक्षमतेची उभारणी, स्वच्छ हवा आणि शाश्वत वाहतूक यंत्रणा हे सहा संकल्पनाधारीत कृती मार्ग आहेत.

आराखड्याच्या मांडणीसाठी मुंबईतील हरितगृह वायूंचे प्रमाण हे जागतिक निकषांचा वापर करुन काढण्यात आले आहे. त्यानुसार 2030 आणि 2050 मध्ये उत्सर्जन घटविण्याच्या धोरणांचा मार्ग शोधला आहे. वातावरणीय बदल आव्हानाच्या परिस्थितीनुसार शहराच्या संवेदनशीलता मूल्यांकनासाठी उपग्रहाधारीत प्रतिमांचा वापर करुन गंभीर जोखमीचे घटक शोधले आहेत.

“नवीन नैसर्गिक रचनांची उभारणी आणि संरक्षण केल्यास, पूरपरिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यायोग्य अस्तित्वातील आणि नियोजित पायाभूत सुविधांसाठी त्या मदतकारी ठरु शकतील. वातावरणीय बदल कृती आरखडा हा विकास आराखडा 2034 च्या अंमलबजावणीसाठी आणि सक्षम 2030 दृष्टीकोनासाठी मार्गदर्श, दिशादर्शक दृष्टीकोन म्हणून पाहता येईल. हा आराखडा ठोकळेबाज नसून शहर प्रशासनास ठोस आणि सर्वसमावेशक अशा सक्षम मुंबईसाठी प्रवाही आणि प्रभावी काम करण्यास समर्पक असेल,” असे डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर फॉर सस्टेनेबल सिटिजच्या सहयोगी संचालक लुबैना रंगवाला म्हणाल्या.

अनेक आघाड्यांवर सध्या सुरु असलेले काम

वातावरण संकट हाताळण्यासाठी गेल्या एक वर्षापासून बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बेस्ट आणि इतर अशा राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी अनेक क्षेत्रांमध्ये याआधीच काम सुरु केले आहे.

पाणी साठवण्याच्या टाक्या 

शहरातील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी शहरात हिंदमाता, दादर आणि परळ या ठिकाणी जमिनीखाली साठवणुकीच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. 300 मिमीपर्यंत किंवा सातत्याने चार तासापेक्षा अधिक काळ अतिवृष्टीच्या घटना घडणाऱ्या टोक्योमध्ये बांधलेल्या प्रकल्पाप्रमाणे हे आहे.

फ्लोटिंग डेब्रिस ट्रॅपिंग बूम्स

“शहरातील जलप्रवाहांवरील ताण कमी करण्यासाठी चिंताजनक अशा नऊ ठिकाणी तरंगता कचरा अडविण्यासाठीची यंत्रणा ( फ्लोटिंग डेब्रिस-ट्रॅपिंग ट्रॅश बूम्स) तैनात करण्याची योजना आहे. यामध्ये दहिसर, ओशिवरा आणि पोयसर नदी तसेच महत्वाच्या नाल्यांचा समावेश आहे. त्याशिवाय मनोरी, मालाड (पश्चिम) जवळ शहरातील पहिला निक्षारिकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून, तेथे दिवसाला 200 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबईच्या 10-15 टक्के रहिवाशांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या कमतरतेतून दिलासा मिळेल.” असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, डॉ. संजीव कुमार म्हणाले.

नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण

महाराष्ट्र राज्याने नुकतेच नवीन इलेक्ट्रीक वाहन धोरण 2021 जाहीर केले आहे. 2025 पर्यंत राज्यात नव्याने नोंद होणाऱ्या वाहनांपैकी 10 टक्के वाहने ही इलेक्ट्रीक वाहने असतीस अशी राज्यास अपेक्षा आहे. या धोरणानुसार मुंबईतील पहिले सार्वजनिक इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन कोहीनूर स्क्वेअर इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दादर वाहनतळ येथे बसविले जाईल. याशिवाय हे धोरण मुंबई प्रदेशात 1500 चार्जिंग स्टेशन्स बसविले जातील अशी अपेक्षा करते.
यापुढील काळात पूर्णपणे इलेक्ट्रीक बसगाड्या खरेदी अथवा भाडेतत्वावर घेतल्या जातील असे नुकतेच बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टने (बेस्ट) जाहीर केले आहे. 2022च्या अखेरीपर्यंत बेस्टच्या बस ताफ्यातील 45 टक्के वाहने ही इलेक्ट्रीक असतील अशी बेस्टला अपेक्षा आहे. तसेच हवा प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेलवर धावणाऱ्या 250 बसगाड्यांचे रुपांतर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आधारीत करण्याची बेस्टची योजना आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग पिट्स

याशिवाय शहराच्या लांबीरुंदी व्याप्तीच्या अनुंषगाने रस्त्यांचे चांगले जाळे तयार असण्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे, जेणेकरुन पंधरा मिनिटातील क्लस्टर्स सक्षम होतील. याशिवाय संपूर्ण शहरात पाच हजार ठिकाणी पर्जन्य जलसंचयाची सुविधा (रेनवॉटर हार्वेस्टिंग पिट्स) तयार करण्याची योजना असून. त्यापैकी अनेक मोठे प्रकल्प हे शहराच्या मध्यभागी असणार आहेत. जेणेकरुन वाहून जाणाऱ्या पावसाचे पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या अन्य वापरासाठी साठवता येईल.
“एमकॅपच्या माध्यमातून या सर्व प्रकल्पांना एका प्रभावी उद्दीष्टाची दिशा मिळेल,” असे डॉ. कुमार म्हणाले.

हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात ऊर्जा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक

 

बृहन्मुंबई महानगरपालिका, राज्य शासनाच्या यंत्रणा आणि खासगी कंपन्या यांनी 2010 आणि 2020 या दरम्यान वाहतूक, कचरा, ऊर्जा आणि इतर अशा विविध क्षेत्रातून होणाऱ्या उत्सर्जनाची आकडेवारी नोंदवली आहे. त्यानुसार मुंबई शहरात उत्सर्जन होणाऱ्या कार्बनडायऑक्साईडचे एकूण प्रमाण हे अंदाजे 34.3 दशलक्ष टन इतके आहे.
2019 च्या आकडेवारी अंदाजानुसार मुंबई शहरात प्रति व्यक्ती अंदाजे 2.67 टन इतका कार्बन डायऑक्साईड वाटा आहे, तर भारतातील प्रतिव्यक्ती वाटा हा १.९१ टन कार्बन डायऑक्साईड इतका आहे. ऊर्जा क्षेत्राकडून उत्सर्जित होणारे हरितगृह वायूंचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजेच 71 टक्के इतके आहे. तर वाहतूक क्षेत्राचा वाटा 24 टक्के आणि घन कचरा व्यवस्थापनाचा वाटा पाच टक्के इतका आहे. ‘मुंबईतील वीजवापर हा सर्वाधिक असून त्यापैकी 95 टक्के वीजेची निर्मिती ही औष्णिक प्रकल्पाद्वारे होते, त्यामुळे ऊर्जा क्षेत्र हे सर्वाधिक उत्सर्जक आहे,’ असे रंगवाला यांनी नमूद केले.

शहरातील पूर, वाढते तापमान आणि तीव्र हवामान

 

डॉ. कुमार यांच्यामते, वातावरणीयदृष्ट्या शहरी पूर आणि वाढते तापमान ही दोन महत्वाची आव्हाने मुंबई शहरापुढे आहेत. “गेल्या पन्नास वर्षातील तापमानाचा कल पाहता (भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार) तापमानात स्थिर अशी वाढ दिसून येते. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी तापमानातील अनियमितता, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे हिवाळी महिने उन्हाळी महिन्यांपेक्षा अधिक वेगाने उष्ण होताना दिसतात.’ असे डॉ. कुमार यांनी यावेळी नमूद केले.
एमकॅपमध्ये माहितीच्या मूल्यांकनाद्वारे वातावरणाच्या अनिश्चिततेमुळे शहरातील संवेदनशील समूह आणि भाग शोधण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 37 स्वयंचलित हवामान केंद्राच्या नोंदीनुसार गेल्या दहा वर्षात सरासरी पातळीवर सहा मुसळधार, पाच अति मुसळधार आणि चार अतिवृष्टीचे दिवस प्रत्येक वर्षात दिसून येतात. तसेच दरवर्षी मान्सूनमधील मुंबईच्या पावसाचे प्रमाण हे अंदाजे 10 टक्के मुसळधार, नऊ टक्के अति मुसळधार आणि सहा टक्के अतिवृष्टी या प्रकारे दिसून येते.

भारतीय हवामान विभागाच्या वर्गवारीनुसार एका दिवसात 64.5 मिमी ते 115.5 मिमी पाऊस म्हणजे ‘मुसळधार’, 115.6 ते 204.4 मिमी पाऊस म्हणजे ‘अति मुसळधार’ आणि 204.5 मिमीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे ‘अतिवृष्टी’ असे आहे.
2017 ते 2020 या चार वर्षात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये स्थिर पण सातत्याने वाढ होताना दिसते. म्हणजेच मुंबईतील अतिवृष्टीची वारंवारीता ही विशेषत: गेल्या चार वर्षात वाढत आहे, असे रंगवाला यांनी नमूद केले. ‘भौगोलिकदृष्ट्या पाहता अतिवृष्टीच्या सर्वाधिक घटना वरळी-दादर, कुर्ला आणि अंधेरी या पश्चिम आणि मध्य मुंबईत झालेल्या दिसतात,’ असे त्यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (पर्यावरण) सुनिल गोडसे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.


हे ही वाचा – माझ्या घरावर आलेल्या ‘चिव’सैनिकांना पोलिसांनी चोप दिला, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -