घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र सदन घोटाळा : कोर्टाकडून छगन भुजबळ दोषमुक्त

महाराष्ट्र सदन घोटाळा : कोर्टाकडून छगन भुजबळ दोषमुक्त

Subscribe

जनतेचा आशीर्वाद पाठिशी

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोर्टाकडे दोषमुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातून आपली नावे वगळण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे कोर्टाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी अर्जात म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी कोर्टाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे.

कोर्टाने दोषमुक्त केल्यानंतर ‘सत्य परेशान होता है पराजित नही’ अशी पहिली प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली. जनतेच्या आशीर्वादामुळेच दोषमुक्त झालो. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असे सांगतानाच, तुमचा भुजबळ करू असे म्हणणार्‍यांनाही त्रास होणार आहे, असा टोलाही भुजबळ यांनी त्यांच्या विरोधकांना लगावला.

- Advertisement -

महाराष्ट्र सदन प्रकरणात आमच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले. महाराष्ट्र सदन प्रकरणात कंत्राटदाराला एक रुपया देखील मिळाला नाही. जमिनीचा एक फूट एफएसआयही मिळाला नाही. असे असताना महाराष्ट्र सदनातून ८०० कोटी रुपये उभे केले यावरच ईडीची केस असल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मला त्रास देण्यासाठी आठ- आठ खटले टाकण्यात आले. दोन वर्षांंपेक्षा अधिक काळ समीर आणि मला तुरुंगात रहावे लागले. या खटल्यातून आम्हाला वगळण्यात यावे, कारण आमचा काही दोष नाही हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शेवटी जनतेच्या आशीर्वादाने आम्ही या संकटांना तोंड दिले आणि आज दोषमुक्त झालो. तुरुंगात असताना मला आतड्यांचा त्रास झाला. पॅनक्रियाच्या त्रासातून मी बचावलो. त्याबद्दल केईएमच्या डॉक्टरांना मी धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. ज्यांना हायकोर्टात जायचे त्यांनी खुशाल जावे. कारण सत्य हे कोणत्याही कोर्टात सारखेच असते. आता काही लोक अजूनही मला शांतपणे झोपू देणार नाहीत. पण याआधीही आणि नंतरही समाधानाची झोप लागणार आहे,असेही ते म्हणाले. भुजबळ करू म्हणणार्‍यांनाही त्रास होणार. मला न्यायदेवतेने निर्दोष सोडले पण त्यांनाही त्रास होणार आहे, असा टोला छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

निर्दोष मुक्तता झाल्यानंतर शरद पवार यांना भेटलो. कारण त्या कठीण काळात पवारांनी मला साथ दिली. त्यांना भेटणे आवश्यक होते. शरद पवार यांना वर्षावर भेटायला गेलो. तिथे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचीही भेट झाली. निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल त्यांनी आपले अभिनंदन केल्याचेही भुजबळ म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके आणि गुलाल उधळत आनंद साजरा केला आहे.

छगन भुजबळ यांनी यावेळी शेरोशायरीही केली. साज़िशें लाखो बनती हें मेरी ‘हस्ती’ मिटाने की… बस ‘दुआयें’ आप लोगों (जनता) की उन्हें ‘मुकम्मल’ नही होने देती, अशी शेरोशायरी करताना आमच्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही असेही ते म्हणाले.

छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची लाचलुचपत कोर्टाकडून महाराष्ट्र सदन केसमधून निर्दोष मुक्तता झाली. या निर्णयाविरोधात मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे.
-अंजली दमानिया,सामाजिक कार्यकर्त्या

आगे आगे देखो होता है क्या?
-किरीट सोमय्या, नेते, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -