घरताज्या घडामोडीधोकादायक इमारतीतील रहिवाशांना दक्षिण मुंबईतच संक्रमण सदनिका

धोकादायक इमारतीतील रहिवाशांना दक्षिण मुंबईतच संक्रमण सदनिका

Subscribe

मुंबईतील धोकादायक इमारतींतील भाडेकरू रहिवाशांची मुंबई उपनगरातील संक्रमण शिबिरात स्थलांतरित होण्याबाबत उदासिनता आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे यंदाच्या वर्षी जाहीर केलेल्या मुंबई शहरातील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू /रहिवाशांकरिता दक्षिण मुंबईतच पर्यायी निवासाकरिता १७७ गाळे उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यांतर्गत  ४७ भाडेकरू /रहिवाशांना संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती , मंडळाचे सभापती श्री विनोद घोसाळकर यांनी आज दिली.

पत्रकारांशी बोलताना श्री. घोसाळकर यांनी सांगितले की, दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू /रहिवाशांना निष्कासनाची सूचना मिळाल्यानंतर उपनगरातील संक्रमण शिबिरांत स्थलांतरित होण्यास नकार दर्शवितात. या परिस्थितीचा सकारात्मक विचार करता  आणि  अपघातामुळे जीवित व वित्त हानी टाळता यावी याकरिता मंडळाने  पुनर्रचित  इमारतींतील गाळे धोकादायक इमारतींतील भाडेकरू \रहिवाशांकरिता उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. दक्षिण मुंबईतील माजगाव, ताडदेव , दादर, खेतवाडी, वरळी , न्यू हिंद मिल , इस्त्राईल मोहल्ला अशा अनेक ठिकाणी हे गाळे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आवश्यकता भासल्यास मुंबई मंडळाकडे मागणी नसलेल्या लहान आकाराच्या सदनिका संक्रमण शिबीर गाळा म्हणून वर्ग करण्याबाबत देखील कार्यवाही करण्यात येईल, असे श्री घोसाळकर यांनी सांगितले.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत १४ हजार ७५५ उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत.  दरवर्षी  या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते. यंदाच्या वर्षी  २१ इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत. या अतिधोकादायक २१ इमारतींमध्ये ४६० निवासी व २५७ अनिवासी  रहिवासी / भाडेकरू आहेत. यापैकी २३६ निवासी भाडेकरू / रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे.  पहिल्या  टप्प्यांतर्गत  ४७ भाडेकरू /रहिवाशांना यासंक्रमण  गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित १७७ निवासी भाडेकरू / रहिवाशांना   आवश्यकतेनुसार त्यांना गाळे उपलब्ध करवून देण्यात येतील, अशी माहिती घोसाळकर यांनी दिली.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -