घरमहाराष्ट्रकशेडी बोगद्याचे काम वेगात

कशेडी बोगद्याचे काम वेगात

Subscribe

एक तासाचे अंतर १० मिनिटांवर येणार

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याचे काम वेगात सुरू आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणार्‍या, तसेच चौपदरीकरणातील ‘माईल स्टोन’ ठरणार्‍या या बोगद्यामुळे घाटातून प्रवासासाठी कापावे लागणारे १ तासांचे अंतर आता अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे.

कशेडी घाटाच्या पायथ्याशी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका हद्दीत भोगाव गावाजवळ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या कशेडी हद्दीत बोगद्याचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी असुरक्षित आणि धोकादायक ठरलेल्या कशेडी घाटात सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. त्यात अवजड आणि रसायनवाहू वाहनांमुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. परिणामी कशेडी घाटाचा प्रवास नेहमीच सत्वपरीक्षा पहाणारा ठरत आला आहे. मात्र येत्या दीड वर्षांत दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवास सुसह्य होणार आहे. खेड (कशेडी) बाजूकडून बोगद्याचे अंदाजे तीनशे मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. तसेच काम भोगाव बाजूला सुरू आहे. बोगद्यामध्ये जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी तीन अशा सहा मार्गिका असणार आहेत. तसेच आपत्कालीन व्यवस्थाही तयार केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या निगराणीखाली बोगद्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे पावणेदोन किलोमीटर लांबीच्या या बोगद्यात एखाद्या वाहनाला पुन्हा उलट्या दिशेला जायचे असेल तर तशी व्यवस्था या आपत्कालीन व्यवस्थेत अंतर्भूत आहे. तसेच बंद पडलेले वाहनही याच व्यवस्थेतून अन्यत्र हलविले जाईल. एका बाजूला डोंगर, तर दुसर्‍या बाजूला खोल दरी असलेल्या कशेडी घाटात रात्री किंवा पावसाळ्याच्या दिवसात वाहन बंद पडले किंवा वाहतूक कोंडी झाली तर वाहनचालकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ४० किलोमीटरच्या घाटमार्गाला पर्यायी मार्ग ठेवण्याची मागणी अनेकदा झाली आहे. अखेर चौपदरीकरणाच्या निमित्ताने बोगद्याचे काम होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून यासाठी सर्वेक्षण सुरू होते. रिलायन्स इन्फास्ट्रक्चर्स कंपनी हे काम करीत असून, त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरली जात आहे. दिवस-रात्र हे काम सुरू आहे.

कशेडी घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या १० वर्षांपासून भोगाव खुर्द गाव हद्दीत रस्ता दरवर्षी चार ते पाच फूट खचत आहे. आता नवीन चौपदरी मार्ग कशेडी घाटातील धामणदेवी फाट्याजवळील दत्तवाडीजवळ खाली उतरला आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या भोगाव खुर्द आणि भोगाव बुद्रुक गावाजवळून रस्ता जात असल्याने पावसाळ्यात या दोन गावांच्या हदीत कोसळणार्‍या दरडींचा धोका आता टळणार आहे.

- Advertisement -

कशेडी घाटात वाहतूक कोंडी किंवा वाहतूक धीम्या गतीने होत असते तेव्हा हजारो मनुष्य तास वाया जाण्याबरोबर इंधनाचीही प्रचंड नासाडी होत असते. याशिवाय वेडीवाकडी आणि अवघड वळणे यामुळे घडलेल्या अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शेकडा जायबंदी झाले आहेत. बोगद्यामुळे इंधन, वेळेची बचत होण्याबरोबर प्रवासही सुरक्षित होणार आहे.

बोगद्याचे काम करण्यासाठी बूमर हे अत्याधुनिक यंत्र वापरले जात असून, एप्रिल 2021 पर्यंत बोगदा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 2021 च्या अखेरीपर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरू होण्याच्यादृष्टीने कामे केली जात आहेत.
-अमोल महाडकर, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग, महाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -