मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीचे वातावरण, प्रवाशांच्या फ्लाईट्स चुकल्या

CSMIA

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विकेंडसाठी प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठ्या गोंधळाचा फटका बसला. अनेक प्रवाशांची फ्लाईट मिस झाल्याचे प्रकार आज सकाळी घडले. सकाळच्या फ्लाईट्ससाठी तिकिट बुक केलेल्या अनेक प्रवाशांना फ्लाईट मिस होण्याचा अनुभव आला. टर्मिनल २ येथे सुरू असलेल्या गोंधळामुळे विमानतळावर मोठ्या रांगांसह गर्दी पहायला मिळाली. सुरक्षेच्या कारणामुळेच अनेक प्रवाशांना फ्लाईट्स मिळाली नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षा विभागाचे काऊंटर्स बंद झाल्यानेच अनेक प्रवाशांना बोर्डिंग गेट्सपर्यंत पोहचता आले नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाढलेली संख्या पाहता ही गर्दी उसळली असल्याचे बोलले जात आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी हाताळण्यासाठी कर्मचारी वर्ग अपुरा असल्यानेच विमानतळावर गर्दीमुळे चेंगराचेंगरीचेही प्रकार झाल्याचे ट्विट काही युजर्सने केले आहे. महत्वाचे म्हणजे इतका गोंधळ होऊनही एअरपोर्ट ऑथोरिटीकडून एकही स्पष्टीकरण किंवा ट्विट करण्यात आले नाही.

देशभरात सणासुदीचे दिवस सुरू झालेले असतानाच मुंबई एअरपोर्ट मात्र ही गर्दी हाताळण्यासाठी तयार नसल्यानेच ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या परिस्थितीबाबतचे अतिशय संतापजनक असे ट्विट विशाल ददलानीने केले आहे. विशाल दललानीला आलेल्या अनुभवात त्याने गोंधळाच्या सगळ्या वातावरणाबद्दल लिहिले आहे. मशीन बंद पडत आहेत, गर्दी अनावर होत आहे आणि अशातच राग अनावर होतानाच सगळीकडे गोंधळच गोंधळ पहायला मिळत असल्याचे ट्विट विशालने केले आहे.

अनेक लोक रांगेत ताटकळत उभे राहत आहेत. अशातच चेंगराचेंगरीचा फटकाही अनेक जणांना बसला आहे. लोक एकमेकांना ढकलतच पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ट्विट काही युजर्सने केले आहे. सुरक्षा रक्षकांकडून तसेच एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांकडून कोणत्याच प्रकारची परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न होताना दिसत नसल्याचेही ट्विट युजर्सने केले आहेत. त्यातच छोटी मुलेही या चेंगराचेंगरीत जखमी झाल्याचे अर्जुस वॅस या युजरने ट्विट केले आहे.