Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तुम्ही अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?, महापौर किशोरी पेडणेकर चंद्रकांत पाटलांवर...

तुम्ही अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?, महापौर किशोरी पेडणेकर चंद्रकांत पाटलांवर संतापल्या

Subscribe

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज कामकाजाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशन सुरु झाले तरी सभागृहात उपस्थित राहिले नव्हते. यावरुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्याला, आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना तुम्ही विरोधी पक्षनेत्या करणार का? असा खोचक सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या आहेत. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, माझे संस्कार सांगतात इतक्या मोठ्या व्यक्तीवर मी बोललं नाही पाहिजे. पण ते जर एक पत्नी म्हणून रश्मी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवणार का? असे म्हणत आहेत. मग ते अमृता देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देणार का? हे पहिले त्यांना विचारले पाहिजे कारण अमृता फडणवीस या अधिक चर्चेत असतात. रश्मी ठाकरे या कधीही राजकीय चर्चेत नसतात असे असतानाही त्यांचे नाव घेतात. तुम्हाला कळतंय का स्त्रियांचे किती हनन करणार आणि तुम्ही सांगता आदर करतो. एकवेळ आदित्य ठाकरेंचे नाव घेतलं तर ठीक आहे कारण ते मंत्री आहेत असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महापौर किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, अमृता फडणवीस चर्चेत आहेत तर त्यांना बनवा, ज्या घरी आहेत. त्यांच्यावर टीका कशाला करताय? असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. हा प्रकार अजिबात करुन देणार नाही. राजकारणाची पातळी किती खाली आणणार आहात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली पाहिजे. महिलांचा अनादर करणे ही हिंदू संस्कृती नाही असा घणाघात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर केला आहे.

चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले?

राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्यामुळे विरोधक संतापले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनाबाहेर संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणं स्वाभाविक आहे. आमचा एवढाच आग्रह आहे की, परंपरा आणि नियमानुसार कोणाला तरी चार्ज द्यावा लागतो. अन्य दोन पक्षांबद्दल त्यांचा अविश्वास स्वाभाविक आहे. कारण त्यांनी घेतला चार्ज तर ते सोडणारच नाहीत. पण त्यांच्या पार्टीमध्येही कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यायला पाहिजे. आदित्य ठाकरेंवरही विश्वास नसेल तर रश्मी ठाकरेंकडे चार्ज द्यावा, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.


- Advertisement -

हेही वाचा : …तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज रश्मी ठाकरेंना द्या, चंद्रकांत पाटलांची कोपरखळी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -