मारूती मोरे
मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी (2 जानेवारी) सकाळी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळ मुंबई महापालिकेच्या पिसे बंधारा, पिसे पंपिंग स्टेशन आणि जल शुद्धीकरण प्रकल्प या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी तब्बल अडीच तास पाहणी केली. काही दिवसांपूर्वी पिसे पंपिंग स्टेशनमध्ये आणि पिसे विद्युत उपकेंद्रात ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड झाला होता. तत्काळ दुरुस्ती कामे करण्यात आल्याने विद्युत उपकेंद्रातील विद्युत अभियंते, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले. (Mumbai municipal commissioner inspected major water supply facilities)
हेही वाचा : Mumbai BMC : 31 डिसेंबरपर्यंत 68 टक्के मालमत्ता कर वसुली
मुंबई शहराला दररोज 3,950 दशलक्ष लिटर आणि ठाणे, भिवंडी, निजामपूर महापालिका हद्दीत मुंबई महापालिका दररोज 180 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करते. या पाणीपुरवठ्यात पिसे बंधारा आणि पांजरापुर जल शुद्धीकरण केंद्र यांची मोलाची भूमिका आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे भागातील दैनंदिन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पिसे बंधारा, पिसे पंपिंग स्टेशन आणि पांजरापुर जल शुद्धीकरण केंद्र हे नियमितपणे सुरू ठेवणे महत्वाचे आहे. पण या ठिकाणी काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचा थेट परिणाम हा पाणी पुरवठ्यावर होतो. त्यामुळे दैनंदिन पाणी पुरवठ्यात कधी कधी 10 टक्के ते 15 टक्के पर्यंत पाणी कपात सुद्धा करावी लागते. तसेच, तांत्रिक बिघाड युद्धपातळीवर दूर करणे महत्त्वाचे असते. अन्यथा त्याचा आणखीन विपरीत परिणाम पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील महत्वाचा भाग असलेल्या आणि मुंबई महापालिका संचालित पिसे जल उदंचन केंद्र, विद्युत उपकेंद्र तसेच पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र येथे मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवारी (2 जानेवारी) सकाळी 7.45 ते सकाळी 10.15 या कालावधीत अडीच तास पाहणी केली. तसेच यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच, दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत अधिकारी, कामगार, कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, उपप्रमुख जल अभियंता (पिसे – पांजरापूर संकुल) राजेंद्र वावेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.