घरताज्या घडामोडीमुंबई महानगरपालिका स्वतः ऑक्सिजनची निर्मिती करणार

मुंबई महानगरपालिका स्वतः ऑक्सिजनची निर्मिती करणार

Subscribe

मुंबईतील रुग्णालयात सध्या दररोज २३५ मे. टन इतका ऑक्सिजनचा साठा आवश्यक

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनची कमतरता कायमस्वरुपी दूर करण्यासाठी मुंबई महापालिका आता स्वतःच ऑक्सिजनची निर्मिती करणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला आयात ऑक्सिजनसाठी येणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसात ऑक्सिजनची तीव्र कमतरता भासल्याने सहा रुग्णालयातून कोरोना बाधित १६८ रुग्णांना तातडीने अन्य रुग्णालयात स्थलांतरित करावे लागण्याची नामुष्की ओढवली होती. आजही मुंबईत पालिकेकडे ऑक्सिजनचा आवश्यक साठा उपलब्ध नाही. त्यामुळे नाईलाजाने ऑक्सिजनसाठी वारंवार मागणी करावी लागत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनची तातडीने आवश्यकता भासते. अशावेळी ऑक्सिजनची कमतरता भासल्यास ते रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.

- Advertisement -

मुंबईतील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी गुजरात, विशाखापट्टणम व रायगड येथून ऑक्सिजनचा साठा मागवावा लागला आहे. मुंबईतील रुग्णालयात सध्या दररोज २३५ मे. टन इतका ऑक्सिजनचा साठा आवश्यक असतो.

त्यामुळे आता पालिकेने ऑक्सिजनबाबत निर्माण होणारी समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबईत कोविड जम्बो सेंटर्स, कुर्ला भाभा, गोवंडी शताब्दी रुग्णालय या ठिकाणी पालिका स्वत: ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी प्लांट तयार करणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. पालिकेने स्वतः प्लांट उभारून ऑक्सिजनची निर्मिती केल्याने मुंबईसाठी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. तसेच, स्वत: ऑक्सिजन निर्मिती केल्याने ऑक्सिजन आयात करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत तो ऑक्सिजन स्वस्त किमतीत उपलब्ध होणार आहे. पालिकेला स्वतः निर्माण केलेला ऑक्सिजन हा १९ रुपयांना एक हजार लिटर इतक्या कमी दरात उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -