मुंबई महापालिका निवडणूक जिंकणार, मुंबईला खड्डेमुक्त करणार : मुख्यमंत्री

२५ वर्षे सत्ता उपभोगूनही त्यांनी मुंबईसाठी काहीच विकासकामे केली नाहीत. मात्र आम्ही राज्यात सत्ता आल्यावर फक्त सात महिन्यात मुंबईत दर्जेदार रस्ते, सुशोभीकरण व विकासकामे करून मुंबईचा कायापालट करीत आहोत. आम्हाला मुंबई महापालिका जिंकायची आहे.

मुंबई : २५ वर्षे सत्ता उपभोगूनही त्यांनी मुंबईसाठी काहीच विकासकामे केली नाहीत. मात्र आम्ही राज्यात सत्ता आल्यावर फक्त सात महिन्यात मुंबईत दर्जेदार रस्ते, सुशोभीकरण व विकासकामे करून मुंबईचा कायापालट करीत आहोत. आम्हाला मुंबई महापालिका जिंकायची आहे. आम्ही मुंबईला शांघाय नव्हे पण मुंबईला सुंदर व खड्डेमुक्त बनविणार आहोत, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. (Mumbai Municipal Corporation will win elections will make Mumbai pothole free Chief Minister Eknath Shinde)

मुंबई महापालिकेतर्फे संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण करण्यासाठी ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांचे भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी दुपारच्या सुमारास चेंबूर (पश्चिम), टिळक नगर परिसरातील लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे करण्यात आले. तसेच, मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ तसेच, टिळक नगर, नेहरु नगर व सहकार नगरातील मलनि:सारण वाहिन्यांच्या कामांचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वरीलप्रमाणे निर्धार व्यक्त केला. यावेळी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राहुल शेवाळे, खा. पुनम महाजन, आमदार प्रसाद लाड, मंगेश कुडाळकर, राजहंस सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल आदी मान्यवर उपस्थित होते.

आता महापालिका जिंकायची

लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. त्यामुळेच तर शिवधनुष्य आमच्याकडे आला आहे. आमचा नेम अचूक असतो, हे आपण सात महिन्यांपूर्वी पाहिले आहे. आम्ही दिवस रात्र काम करीत आहोत. आता मुंबई महापालिका आम्हाला जिंकायची आहे. तुम्ही आरोप करा, मात्र आम्ही त्याला कामाने उत्तर देवू, असा आत्मविश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

विकासकामे न करता जनतेचे पैसे बँकांत ठेवले

गेली २५ वर्षे सत्ता भोगणार्यांनी आवश्यक विकासकामे न करता जनतेचे पैसे बँकांत साठवून ठेवले. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ‘मुंबईची तुंबई’, ‘ मुंबई गेली खड्ड्यात’, अशा बातम्या येत असतात. मात्र आता पुढील दोन वर्षात मुंबईमध्ये झपाट्याने विकासकामे करून मुंबईचा कायापालट करण्यात येणार आहे. जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी, विकासकामांसाठी, दर्जेदार रस्ते बनवून मुंबईला खड्डे मुक्त मुंबई बनविणार आहोत. अगदी खड्डा शोधायला बक्षीस लावायला लागेल, असा आत्मविश्वासही मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला. पालिकेने बँकात साठवलेला पैसा आता विकासकामांसाठी वापरला जाणार असल्याने विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात उपचार करण्यात यावेत, असा टोमणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

मुंबईला खड्डेमुक्त करणार

मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावरच्या खड्ड्यांची चर्चा होत असून ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे सांगितले. तसेच, एकाच रस्त्यावर खर्च करायचे आणि जनतेला खड्ड्यात टाकायचे ही नीती आम्ही बदलली आहे. आम्ही रस्ते कामे करताना ते दर्जेदार बनविणार असून त्यावर किमान ५० वर्षे तरी खड्डे पडणार नाहीत, अशी कामे करीत आहोत. येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.


हेही वाचा – लव जिहाद विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे; नवी मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा