Homeमहाराष्ट्रMumbai : पालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा पूर्ववत, प्रशासनाचे हे आश्वासन

Mumbai : पालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा पूर्ववत, प्रशासनाचे हे आश्वासन

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेने औषध पुरवठादारांना त्यांच्या 120 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम पुढील 2 आठवड्यांमध्ये देण्याचे आश्वासन दिल्याने औषध पुरवठादारांनी पालिका रुग्णालयातील औषध पुरवठा पुन्हा एकदा सुरू केला आहे, मात्र पालिकेने दिलेल्या आश्वासनानुसार थकीत पैसे न मिळाल्यास पुन्हा औषध पुरवठा बंद करण्यात येईल, अशी तंबी ऑल इंडिया ड्रग्ज सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली आहे. (Mumbai municipal hospitals Medicine supply restored)

हेही वाचा : Mumbai BMC : मुंबई महापालिका राबविणार कचरा मुक्त तास मोहीम 

मुंबई महापालिकेच्या विविध 27 रुग्णालयांत रुग्णांना आवश्यक असणार्‍या दैनंदिन औषधांचा व वैद्यकीय उपकरणे, साहित्यांचा पुरवठा करणार्‍या औषध पुरवठादारांचे गेल्या 6 महिन्यांपासून महापालिकेकडे 120 कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही संबंधित अधिकार्‍यांनी दाद दिली नाही. थकीत रक्कम दिली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या औषध पुरवठादारांच्या संघटनेने महापालिका रुग्णालयाचा औषध, वैद्यकीय साहित्य यांचा पुरवठा सोमवारपासून बंद केला. त्यामुळे पालिका रुग्णालयांत औषधांची टंचाई निर्माण झाली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून महागड्या दराने आवश्यक औषधांची खरेदी करावी लागली.

त्यानंतर विरोधकांनी तिखट शब्दांत पालिकेची अब्रू काढली. सायंकाळी मुंबई महापालिका प्रशासन, संबंधित अधिकारी झोपेतून खडबडून जागे झाले. त्यानंतर सायंकाळी संबंधित अधिकार्‍यांची याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक झाली. अखेर मंगळवारी पालिका प्रशासनाने संबंधित औषध पुरवठादारांच्या एकूण थकीत रकमेपैकी ५० टक्के रक्कम 2 आठवड्यांमध्ये देण्याचे कबूल केले. तसेच उर्वरित बिलाची रक्कम फेब्रुवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने देण्याचे आश्वासन दिल्याने औषध पुरवठादारांनी पालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा पूर्वीप्रमाणे करण्याचे मान्य केले, मात्र जर पालिकेने थकीत बिलाची रक्कम देण्यात पुन्हा हलगर्जीपणा केल्यास पालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा पुन्हा बंद करण्यात येईल, असा इशाराच सदर औषध पुरवठादारांच्या संघटनेने पालिकेला दिला आहे.