मुंबई- नाशिक राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करत वाहतुकीची कोंडी सोडवा; अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील विविध समस्यांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

मुंबई : पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे, यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा कालावधी लागत आहे. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बजवून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीतून या महामार्गाला मुक्त करण्याची आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, मुंबई-नाशिक महामार्ग हा राज्यातला महत्वाचा मार्ग आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. मात्र पावसाळ्यापासून या महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वारंवार वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे मणक्यांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरातील साकेत ब्रीजच्या रखडलेल्या कामामुळे तर या वाहतुक कोंडीत आणखी भर पडत आहे. या महामार्गावर होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे प्रदुषणात भर पडत आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत.

या महामार्गावरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करणे, पुलांचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करणे, अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी ठाणे शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूकदार संघटना, प्रवासी संघटना, स्थानिक नागरिक आदींना विश्वासात घेऊन वाहतुकीचे सुयोग्य आणि प्रभावी नियोजन करावे. या महामार्गाच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याबाबत संबधितांना सूचना द्याव्यात. शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करुन या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या पत्राव्दारे केली आहे.


हेही वाचा : दौलताबाद किल्ल्याचे ८०० वर्षांनी पुन्हा होणार नामकरण; काय आहे इतिहास?