Bully Bai App Controversy: बंगळुरूमध्ये मुंबई पोलिसांकडून सॉफ्टवेअर इंजिनियर विद्यार्थी ताब्यात

बुली बाई अॅप प्रकरणात सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वादग्रस्त बुली बाई अॅप प्रकरणात मुंबई सायबर गुन्हे शाखेने बंगळुरू येथून एका सॉफ्टवेअर इंजिनियर विद्यार्थ्यांला ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा अॅप बंगळुरू येथून तयार करण्यात आला होता. या तरुणाला अद्याप अटक दाखवण्यात आलेली नसली तरी लवकरच त्याला या प्रकरणात चौकशी करून अटक करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

२१ वर्षीय तरुण विद्यार्थी बंगळुरूमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. बुली बाई अॅपच्या पाच फॉलोअर्सपैकी एक असल्याचेही सांगितले जात आहे. त्याला मुंबईत आणले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आयटी अॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

फोटो अपलोड करत मुस्लीम महिलांना टार्गेट

बुली बाई या नावाने गिटहब नावाच्या ऑनलाईन अ‍ॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. तर त्यांचे फोटो अपलोड करत त्यांना टार्गेट देखील केलं जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. फोटोंसोबत किंमत टॅग- डील ऑफ द डे असे लिहिले आहे. याचाच अर्थ महिलांच्या लिलावासाठी हा किमतीचा टॅग लावण्यात आला आहे. मागील वर्षात सुल्ली डील्स या नावाने असा प्रकार उघडकीस आला होता.

दरम्यान, दिल्ली पोलीस या प्रकरणातील गिटहब नावाच्या प्लॅटफॉर्मबाबत मोबाईल अॅपविषयी अधिक तपास करत आहेत. यासोबतच ट्विटरला संबंधित आक्षेपार्ह मजकूर काढण्यास सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : Vaccination for 15-18 age group: नाशकात लसीकरण मोहिमेत गोंधळ, विद्यार्थ्यास कोव्हॅक्सिनऐवजी दिली कोविशिल्ड